


मुंबई | १५ ऑगस्ट —
दादर रेल्वे स्टेशनचे नाव दादर चैत्यभूमी करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह संविधान आर्मीच्या वतीने स्वातंत्र्य दिनी दादर येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांनी केले.
या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते अध्यक्ष गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधापर्यंत विविध विषयांवर आक्रोश व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या — “हेमंत करकरे जिंदाबाद”, “मोदी सरकार हाय-हाय” अशा घोषणांनी संपूर्ण दादर परिसर दुमदुमून गेला.
महत्वाचे म्हणजे, मुसळधार पावसातही संविधान आर्मीचे कार्यकर्ते तिरंगा व संविधान हातात घेऊन रस्त्यावर ठामपणे उभे राहिले. आंदोलनात महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता.
डॉ. रामदास भाऊ ताटे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी ओहोळ ताई (पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा), यल्लाप्पा सलून घे (पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष), युवा नेते रोहित उर्फ राजू ताटे, इंजिनियर करण ताटे, सार्थ ताटे, स्वरा कांबळे, रामावतार चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे पोलीस, जीआरपी, सीआरपीएफ, मुंबई पोलीस यांच्या मोठ्या बंदोबस्तात आंदोलन पार पडले. आंदोलकांनी दादर स्टेशनच्या मोकळ्या जागेत घोषणाबाजी व निवेदन सादर केले. डीआरएम, मुंबई रेल्वे यांनी हे निवेदन स्वीकारून रेल्वेमंत्री व शासनापर्यंत मागण्या पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांनी इशारा दिला की, “लवकरच नामांतर व इतर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १५ दिवसांत अधिक तीव्र रेल रोको आंदोलन करण्यात येईल.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रामदास ताटे (प्रदेश युवा अध्यक्ष) यांनी केले.
आंदोलन शांततेत पार पडले असले तरी संपूर्ण दादर रेल्वे स्टेशन घोषणांनी दुमदुमून गेले होते.
