काळेवाडीत वैचारिक उत्सवाचा जागर’; उत्कर्ष सोशल फाउंडेशनचा उपक्रम ठरतोय पथदर्शक!
काळेवाडी (प्रतिनिधी):
भीमजयंतीचा उत्साह सध्या सर्वत्र शिगेला पोहोचला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात शुभेच्छांचे मोठमोठे फ्लेक्स झळकत आहेत. मात्र, या भाऊगर्दीत अनेकदा महापुरुषांच्या विचारांपेक्षा कार्यकर्त्यांचे फोटोच अधिक दिसतात, अशी खंत सर्वसामान्य व्यक्त करत असतानाच, काळेवाडी येथील ‘उत्कर्ष सोशल फाउंडेशन’ ने मात्र एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
काळेवाडीतील डी-मार्ट परिसरामध्ये सध्या एक वेगळाच ‘जयंतीचा माहोल’ पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दुभाजकांवरील खांबांवर निळ्या रंगाच्या झालरींनी परिसर सुशोभित झाला आहे. विशेष म्हणजे, येथे लावण्यात आलेल्या असंख्य फ्लेक्सवर केवळ आणि केवळ विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच छायाचित्र पाहायला मिळत आहे. या फलकांवर कोणत्याही कार्यकर्त्याचे नाव नाही की फोटो नाही.
प्रस्थापित ‘फ्लेक्स संस्कृती’ला फाटा देत, या फाउंडेशनने बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांचे प्रेरणादायी विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कायद्याचे पालन करत आणि शहराचे विद्रुपीकरण टाळून, केवळ महापुरुषांच्या कार्याला अधोरेखित करणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘पुरोगामी’ विचारांची साक्ष देणारा आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. संदीप केदारे यांनी विशेष कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, “पावलापावलावर शुभेच्छा देणारे फ्लेक्स लागलेले असताना, काळेवाडीत मात्र महापुरुषाचा गौरव आणि त्यांच्या विचारांची मांडणी करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि #अनुकरणीय असाच आहे.”
उत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या या वैचारिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, जयंती साजरी करण्याचा हा ‘पॉझिटिव्ह’ पॅटर्न इतर मंडळांनीही गिरवावा, अशी भावना व्यक्त होत आहे.
