मिरा रोड, (घनश्याम आंबोकर) २६ ऑगस्ट २०२६ माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त मिरा रोड येथे विविध जनहिताचे उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चच्या वतीने आयोजित निःशुल्क आरोग्य, नेत्र व कर्करोग तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, तर काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने ४० दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात आल्या.

सामान्य नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी पराग रिंदानी (Group CEO, Wockhardt Hospitals), मिरा-भाईंदर महानगरपालिका मेडिकल ऑफिसर डॉ. नंदकुमार लहाने, तसेच वॉकहार्ट हॉस्पिटल आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचे सहकार्य लाभले.

विविध तपासण्यांची सुविधा शिबिरामध्ये सीबीसी, आरबीसी, टोटल कोलेस्ट्रॉल, ईसीजी, बॉडी कंपोझिशन अनालिसिस (बीसीए), रक्तदाब आणि नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय ईएनटी, गायनॅकॉलॉजिकल, क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन, व्हीआयए आणि जनरल सर्जिकल तपासण्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. कर्करोग प्रतिबंधाबाबत जनजागृती करत आर्थिक दुर्बल घटकांना वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

दिव्यांग बांधवांना आधार याच सामाजिक बांधिलकीतून काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने ४० दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. दिव्यांग नागरिकांचे दैनंदिन आयुष्य सुलभ व्हावे आणि त्यांना स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणे हीच खरी लोकसेवा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

जनतेच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी लोकसेवा: मुझफ्फर हुसैन “सार्वजनिक जीवनात काम करताना जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी लोकसेवा आहे. वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या शुभेच्छांपेक्षा समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी उपयुक्त कार्य करता येणे, हा माझ्यासाठी अधिक समाधानाचा विषय आहे,” अशी भावना यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed