नवी दिल्ली (अनिल वाघेला) : पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी त्यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्याच्या प्रलंबित जल जीवन मिशनच्या कामांसाठी तात्काळ केंद्रीय निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.पालघर हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांनी आणि दुर्गम भागांनी व्यापलेला आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथील अनेक वाड्या-पाड्यांवर आजही नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या ५६२ नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून, या सर्व कामांची एकूण किंमत सुमारे ९३५ कोटी रुपये इतकी आहे.या सर्व प्रकल्पांपैकी जवळपास ७९ टक्के काम प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे. मात्र, त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५० ते ५२ टक्केच निधी प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. निधीच्या कमतरतेमुळे कंत्राटदारांची सुमारे २३० कोटी रुपयांची देयके थकली आहेत. परिणामी, ऐन उन्हाळ्यात पैशांअभावी जल जीवन मिशनची पुढील महत्त्वाची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्याकडे खासदार डॉ. सवरा यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रमुख मागण्या:
- महाराष्ट्रातील प्रलंबित जल जीवन मिशनच्या योजनांसाठी तात्काळ केंद्रीय निधी वर्ग करण्यात यावा, जेणेकरून रखडलेली कामे मार्गी लागतील.
- जुन्या योजनांची दुरुस्ती (Retrofitting), सिंगल व्हिलेज आणि मल्टी व्हिलेज योजनांसाठी निधी देताना पुरेशी लवचिकता ठेवली जावी.
- ‘SNA-SPARSH’ प्रणालीमधील तांत्रिक अडचणी त्वरित दूर कराव्यात, कारण या तांत्रिक गुंतागुंतीमुळे सुमारे ४७२ कोटी रुपयांचा केंद्रीय निधी पडून असून त्याचा वापर करणे अशक्य झाले आहे.
- ‘SNA-SPARSH’ प्रणालीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात किंवा गरज भासल्यास जुन्या ‘PFMS’ प्रणालीद्वारे निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात यावी.
- बहुतांश काम पूर्ण झालेल्या योजनांसाठी केंद्राचा हिस्सा वेळेवर वितरित केला जावा.
- पालघर जिल्ह्याची कठीण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्याला विशेष प्राधान्य देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा.
पालघरच्या पाणीप्रश्नावर भाष्य करताना खासदार डॉ. सवरा यांनी अतिशय भावनिक भूमिका मांडली. उन्हाळ्याच्या कडक दिवसांत आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांना व कुटुंबांना पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. जर प्रलंबित योजनांसाठी वेळेवर निधी मिळाला, तर या योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचेल आणि नागरिकांचे जीवन खऱ्या अर्थाने सुसह्य होईल, असे त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्र्यांनी या गंभीर विषयात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
