दिल्ली (अनिल वाघेला ): पालघर जिल्ह्याला लाभलेली ११० किलोमीटर लांबीची किनारपट्टी वाचवण्यासाठी आणि किनारपट्टीवरील गावांच्या संरक्षणासाठी ‘आपत्ती निवारण योजने’अंतर्गत (Disaster Mitigation Scheme) तातडीने केंद्रीय आर्थिक मदत मंजूर करावी, अशी आक्रमक आणि महत्त्वाची मागणी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केली आहे. या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.पालघर जिल्ह्याला लाभलेल्या अथांग किनारपट्टीवर दरवर्षी समुद्राची धूप, उधाणाचे पाणी, खवळलेला समुद्र आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे मोठे संकट ओढवते. अनेकदा समुद्राचे पाणी थेट किनारपट्टीवरील गावांमध्ये शिरत असल्याने स्थानिक नागरिकांचे संसार उघड्यावर येतात. नागरिकांची घरे, शेती, बागायती, रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान होते. मच्छिमार बांधव आणि किनारपट्टीवासीयांच्या उपजीविकेवर कायमच टांगती तलवार राहत असून, बदलत्या हवामानामुळे ही समस्या आता अधिकच गंभीर आणि भीषण रूप धारण करत आहे.या गंभीर समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत खासदार डॉ. सवरा यांनी स्पष्ट केले की, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासनाने आपत्ती निवारण योजनेअंतर्गत पालघरमधील असुरक्षित ठिकाणी सागरी संरक्षक भिंती बांधण्याचे प्रस्ताव तयार करून पाठवले आहेत. राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांनीही या कामांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.या प्रस्तावात पालघर आणि डहाणू तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) एकूण १३ कामांचा समावेश असून, यासाठी १२२२६.७६ लाख रुपये म्हणजेच सुमारे १२२.२६ कोटी रुपयांचा सविस्तर निधी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या जनहिताच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन आपत्ती निवारण निधीतून हवी असलेली आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार विनंती डॉ. सवरा यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागल्यास किनारपट्टीवरील हजारो कुटुंबे आणि त्यांच्या सुरक्षित उपजीविकेचे योग्य रक्षण होईल. तसेच, महाराष्ट्राच्या या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वतयारी यंत्रणा अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केला आहे.
