अतिवृष्टीने वसई-विरार, नालासोपाऱ्यात मोहीम रेंगाळली; राजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही
निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेत हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करणाऱ्या केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) पालघरचे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी थेट कारवाईचा कडक इशारा दिला आहे. ‘मतदार यादी सुधारा, नाहीतर थेट कारवाईला सामोरे जा’, अशा कडक शब्दांत प्रशासनाने अधिकाऱ्यांना सुनावले आहे.सध्या जिल्ह्यात मतदारांकडून प्रगणक फॉर्म (EF) भरून घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही भागांत बीएलओ घरोघरी न जाता कार्यालयात किंवा राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.गेल्या ८ ते १० दिवसांत पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वसई, विरार, नालासोपारा भागात सखल भागात पाणी साचल्यामुळे बोईसर, नालासोपारा आणि वसई विधानसभा मतदारसंघांत या मोहिमेची पुरती दैना उडाली आहे. आजतागायत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी अवघे २७.६५ टक्के काम पूर्ण होऊ शकले आहे.
कुठे किती टक्के काम झाले? (मतदारसंघनिहाय आकडेवारी):
- विक्रमगड: ८८% (अव्वल)
- पालघर: ६१%
- डहाणू: ३९%
- बोईसर: ०८%
- वसई: ०७%
- नालासोपारा: ०२% (सर्वात पिछाडीवर)
मोहिमेदरम्यान काही बीएलओ हे घरोघरी न जाता शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी कॅम्प लावून बसत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सूचनेनुसार आणि दबावाखाली काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.यावर आक्षेप घेत जिल्हा प्रशासनाने सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), पर्यवेक्षक आणि ‘बीएलओ’ यांना कडक ताकीद दिली आहे:“सर्व कामकाज केवळ भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांनुसारच व्हायला हवे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कॅम्पमध्ये जाऊन किंवा कोणाच्याही दबावाखाली काम केल्याचे आढळल्यास थेट कायदेशीर कारवाई केली जाईल.”प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देणे, ‘ईएफ’ फॉर्म वाटणे आणि भरलेले फॉर्म गोळा करून पडताळणी करणे ही ‘बीएलओ’ची जबाबदारी आहे. प्रक्रियेत पारदर्शकता राखणे अनिवार्य असून, जिल्ह्यातील एकही पात्र मतदार या यादीतून सुटणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आणि सर्व राजकीय पक्षांना देखील आवाहन केले आहे की, या राष्ट्रीय कामात अडथळे न आणता जिल्हा प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे.
