दोन दिवसांच्या संशयास्पद विलंबाने प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; केवळ चालकावर गुन्हा, ‘मोठे मासे’ मात्र अजूनही सुरक्षित जाळ्यात?

विशेष प्रतिनिधी, वसई

वसई तालुक्यात रेशनच्या शासकीय धान्याची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतरही, कारवाईत झालेला दोन दिवसांचा संशयास्पद विलंब आणि मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा झालेला सुप्त प्रयत्न आता चव्हाट्यावर आला आहे. ‘युवाशक्ती एक्सप्रेस’ने या प्रकरणाचा सातत्याने लावलेला लावून धरलेला पाठपुरावा आणि प्रशासकीय निष्क्रीयतेवर डागलेले तोफगोळे यांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली असून, १५ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जप्त मुद्देमाल आणि चालकाच्या कबुलीनंतरही मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलीस आणि पुरवठा विभागाला आलेले अपयश पाहता, “तपास केवळ चालकाभोवतीच का घुटमळतोय?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

​कारवाई १३ जुलैला, गुन्हा १५ जुलैला; दोन दिवस नक्की शिजलं काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी खानिवडे ब्रिज परिसरात गुजरातच्या दिशेने जाणारा एक संशयास्पद आयशर ट्रक (क्र. DD-01-V-9672) जप्त करण्यात आला होता. या ट्रकमध्ये तब्बल ३५० गोणी गहू आढळून आला होता. त्याच दिवशी नायगाव (बाफणे) येथील एका संशयास्पद गोदामावर छापा टाकून पुरवठा विभागाने ते गोदाम सील केले होते.

​एवढी मोठी आणि ठोस कारवाई होऊनही तब्बल ४८ तास पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल झाला नव्हता. या दोन दिवसांच्या कालावधीत पडद्यामागे नक्की कोणत्या हालचाली झाल्या? मुख्य सूत्रधारांना पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा अटकपूर्व जामिनासाठी वेळ दिला गेला का? असे गंभीर प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ‘युवाशक्ती एक्सप्रेस’ने या संशयास्पद विलंबावर सातत्याने प्रशासनाकडे लेखी पत्रांद्वारे आणि वृत्तांद्वारे जाब विचारल्यामुळेच अखेर प्रशासनाला अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा लागला.

​बोगस ‘क्यूआर कोड’ आणि ‘पियुष’चे कनेक्शन

​वसई तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी भागवत मोहन सोनार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नायगाव येथील गोदामाची तपासणी केली असता तेथे इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि जमिनीवर विखुरलेले गव्हाचे दाणे सापडले, ज्यामुळे काळाबाजार सुरू असल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली.

​तपासादरम्यान ट्रक चालक मोहम्मद मोबीन आझाद उल्ला (रा. वडाळा, मुंबई) याने अत्यंत धक्कादायक कबुली दिली. हा माल नायगाव येथील ‘श्री. पियुष’ यांच्या गोदामातून भरला असून तो गुजरात मधील सुरत येथे जात होता, असे चालकाने सांगितले. विशेष म्हणजे, चालकाने सादर केलेल्या धान्याच्या बिलावरील ‘क्यूआर कोड’ (QR Code) स्कॅन केला असता, कोणतीही माहिती समोर आली नाही. संपूर्ण व्यवहार बोगस आणि कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यावर ₹४.३७ लाखांचा गहू आणि ₹१५ लाखांचा ट्रक असा एकूण ₹१९.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​चालकाचा बळी, पण ‘किंगपिन’ मोकाट?

​या संपूर्ण कारवाईत सर्वात मोठी मेख अशी की, चालकाने स्पष्टपणे ‘पियुष’ नावाच्या व्यक्तीच्या गोदामाचा उल्लेख केला असताना आणि ते गोदाम सील झाले असतानाही, एफआयआरमध्ये आरोपी म्हणून केवळ चालकाचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

  • तो ‘पियुष’ नेमका कोण?
  • त्या गोदामाचा मालक आणि भाडेकरू कोण?
  • जप्त केलेल्या ट्रकचा मूळ मालक कोण?
  • महाराष्ट्रातील गरिबांच्या हक्काचे धान्य गुजरातला पोहोचवणारी ही साखळी कोणाची?

​या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी केवळ एका चालकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पुरवठा विभाग आणि पोलीस हात झटकत असल्याचे चित्र आहे.

​’युवाशक्ती एक्सप्रेस’चा लढा सुरूच राहणार!

​प्रशासकीय दिरंगाई आणि पाठीशी घालण्याच्या प्रवृत्तीला ‘युवाशक्ती एक्सप्रेस’ने आपल्या लेखणीतून चपराक लगावली असली, तरी हा लढा इथेच थांबणार नाही. केवळ एका चालकावर कारवाई करून मूळ सूत्रधारांना अभय देण्याचा प्रयत्न झाल्यास, प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जातील. हे रेशन धान्याचे संघटित रॅकेट पाळेमुळासकट उखडून टाकेपर्यंत आणि त्या ‘मोठ्या माशांना’ बेड्या ठोकेपर्यंत ‘युवाशक्ती एक्सप्रेस’ या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed