नालासोपारा (वसीम अहमद शेख ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहाल केलेली बंधुत्वाची संकल्पना आज नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष कृतीत उतरलेली पाहायला मिळाली. निमित्त होते बाबासाहेबांच्या जयंतीचे. नालासोपारा पूर्व येथील धनु बाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भीमजयंती उत्सवात मुस्लिम समाजाने दाखवलेल्या मोठ्या सहभागामुळे हा सोहळा केवळ औपचारिकता न राहता, तो सामाजिक ऐक्याचा एक प्रेरणादायी दस्तऐवज ठरला आहे.

​वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीचे युवा उपाध्यक्ष आणि आस्था शक्ती सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप कनौजिया यांच्या पुढाकाराने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धनु बाग येथील काँग्रेस कार्यालयाजवळ सकाळपासूनच भीमप्रेमींची मांदियाळी जमली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर, उपस्थित जनसमुदायाने बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदवाक्याचा उच्चार करत समतावादी समाजाची गरज अधोरेखित केली.

सर्वधर्मसमभावाचे दर्शन

या कार्यक्रमाचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिती. राजकीय आणि सामाजिक स्तरावर धर्माच्या नावाने होणाऱ्या ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर, नालासोपाऱ्यातील हा उपक्रम पुरोगामी विचारांची वीण घट्ट करणारा ठरला. “बाबासाहेब हे विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे नसून ते मानवतेचे कैवारी होते,” ही भावना या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली.

उत्सवात सामाजिक उत्तरदायित्व

केवळ घोषणाबाजी न करता, सामाजिक उत्तरदायित्व जपत यावेळी बालगोपाळांना बिस्किटे आणि चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. परिसरातील महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद लुटला. याप्रसंगी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून बाबासाहेबांच्या विचारांवर प्रबोधनात्मक विचार मांडले. स्थानिक नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि सर्वधर्मीयांचा सहभाग यामुळे हा जयंती उत्सव नालासोपाऱ्याच्या सामाजिक इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *