डॉक्टर, वकील अन् गुणवंतांचा गौरव; महिला सक्षमीकरणाच्या जागरणाने ‘संयुक्त जयंती उत्सव’ ठरला नेत्रदीपक

वसई/नालासोपारा: (राजेश जाधव) :-

कायद्याच्या चौकटीत राहून आणि पुरोगामी विचारांची कास धरून, आंबेडकर चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महापुरुषांचा ‘संयुक्त जयंती उत्सव २०२६’ यंदा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. समाजसेविका सौ. मनिषाताई विकास पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने वैचारिक प्रबोधन आणि मनोरंजनाचा सुवर्णमध्य साधला.

सांस्कृतिक मेजवानी आणि गुणवंतांचा गौरव– कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या चित्रकला स्पर्धेने झाली. विजेत्यांसह सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि पदके देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, समाजातील १० वी, १२ वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसह डॉक्टर, वकील आणि सी.ए. यांसारख्या उच्चशिक्षित व्यावसायिकांचा विशेष सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ हा संदेश या निमित्ताने अधोरेखित झाला.

प्रबोधन आणि शक्तीप्रदर्शन – बार्टी संस्थेच्या समतादूत आ. अंजना देवकांत यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन आणि फटाक्यांच्या आतषबाजीनंतर निघालेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक खालू बाजा, लेझीम आणि बनता फिरवण्याच्या खेळांनी मिरवणुकीत रंगत भरली.

सुश्राव्य संगीताची साथ – कार्यक्रमाच्या उत्तरार्धात परेश डहाणू यांच्या प्रसिद्ध ‘कृपा साई बँड’च्या ऑर्केस्ट्राने उपस्थितांची मने जिंकली. आयोजकांनी आलेल्या सर्व नागरिकांसाठी चहा, थंड पाणी आणि स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. “ज्यांनी या कार्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य केले, त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत,” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *