सौजन्य -ABP माझा
वसई, प्रतिनिधी – वसई परिसरात वाढत्या ड्रग्सच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तन लढा संघटनेचे प्रमुख सुशांत पवार यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत गंभीर आरोप केले आहेत. काही पोलीस अधिकारी, पत्रकार आणि स्थानिक ड्रग विक्रेत्यांमध्ये संगनमत असल्याचे ते म्हणाले असून, यासंदर्भातील ठोस पुरावे लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“संपूर्ण पोलीस दल नव्हे, फक्त काही नालायक अधिकारी”
पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझी लढाई सर्व पोलिसांविरोधात नाही. केवळ काही भ्रष्ट पोलिसांच्या कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊ नये, म्हणून मी आजवर माझ्याकडे असलेले पुरावे सोशल मीडियावर मांडलेले नाहीत.”
ड्रग्सची सहज उपलब्धता हा तरुण पिढीच्या भविष्यासाठी धोका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “वसईतील अनेक पानटपऱ्यांवर गांजा व इतर अमली पदार्थ सहज मिळतात. दर काहीशे मीटरवर पोलीस स्टेशन असतानाही अनेक स्टेशनच्या हद्दीत १० ते १५ ड्रग्स विक्रेते खुलेआम व्यवहार करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
स्थानिक तरुण पिढी धोक्यात!
“फक्त छोट्या प्रमाणातील पकडीत काय उपयोग?”
“५ ते १० ग्रॅम एमडी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करून काय साधणार? गरज आहे ती संपूर्ण ड्रग्स साखळी उद्ध्वस्त करण्याची,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
प्रशासनाला स्पष्ट इशारा
“जर स्थानिक ड्रग्स विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर लढाई अधिक तीव्र होणार आहे,” असा इशारा सुशांत पवार यांनी दिला. त्यांनी मागील महिन्याभरात सतत पाठपुरावा करत, विविध पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत..
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, संबंधित विधेयक याच अधिवेशनात मंजूर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
