नालासोपारा| प्रतिनिधी
देशात दरवर्षी शेकडो सफाई कामगार विषारी गॅसने गुदमरुन मृत्युमुखी पडतात. त्यांना ना संरक्षणाची साधने दिली जातात, ना कायदेशीर हमी मिळते. “घाण साफ करताना काय घाणीतच मरायचं का?” असा थेट सवाल परिवर्तन लढा चळवळीचे सुशांत पवार यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही वर्षात घडलेल्या हृदयद्रावक घटना अजूनही सर्वसामान्यांच्या स्मरणात आहेत.
१४ जून २०१९ – गुजरातमधील एका हॉटेलमध्ये सेप्टिक टँकमध्ये काम करताना ७ सफाई कामगारांचा मृत्यू.
९ जून २०१९ – ठाणे शहरात ३ जणांचा मृत्यू.
२ मे २०१९ – नालासोपारा येथे ३ कामगार गुदमरून मृत्युमुखी.
एप्रिल २०१९ – मीरा-भायंदर मध्ये पुन्हा ३ कामगारांचा मृत्यू.
“आम्ही पण माणसं आहोत, आमचंही जगायला हक्क आहे,” असं म्हणत सुशांत पवार यांनी व्यवस्थेवर आणि सरकारवर संतप्त सवाल उभे केले आहेत.
त्यांच्या मते, लाखो कामगार वर्षानुवर्षे शहर स्वच्छ ठेवतात, गटारांमध्ये उतरतात, विषारी गॅसेसच्या टाक्यांमध्ये जीव धोक्यात घालतात – पण त्यांना मिळते काय? महिन्याला १०,००० रुपये आणि आयुष्यभराचे रोग!
महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कामगारांसाठी सुरक्षा यंत्रणा उभारणे, विमा, वैद्यकीय सुविधा व किमान मानवाधिकार पुरवणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“ही वेळ दूर नाही, ज्या दिवशी सफाई कामगारांनी या व्यवस्थेचा बहीष्कार केला, तेव्हा सगळ्या तथाकथित स्वच्छ भारत मोहिमेचा फुगा फुटेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
संपूर्ण देशात स्वच्छता राबवणाऱ्या या कामगारांना समाजात “कचरा वाला” अशी हेटाळणीची वागणूक मिळते. पण हेच लोक खरं तर समाजसेवक, राष्ट्रसेवक आहेत, असं पवार यांनी ठासून सांगितलं.
