




मुंबई | प्रतिनिधी
देशातील संसदीय लोकशाहीची रक्षा करण्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागली, तरी मागे हटणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त आयोजित समाजवादी संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबई लेबर युनियनच्या पुढाकाराने आणि के. सी. कॉलेज, चर्चगेट येथे पार पडलेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान समाजवादी नेते कपिल पाटील यांनी भूषवले. संजय पुजारी हे निमंत्रक होते.
या वेळी शरद पवार म्हणाले, “आणीबाणी ही इंदिरा गांधींनी लावली होती, मात्र नंतर त्यांनी पराभव स्वीकारून देशाची क्षमा मागितली, ही गोष्ट विसरता कामा नये.” त्यांनी संसदीय लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करत संघर्षाची गरज अधोरेखित केली.
कपिल पाटील यांनी या वेळी जोरदार भाषण करत सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण आणि कष्टकरी कामगारांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. “मुंबई महापालिकेच्या खाजगीकरणाविरोधात समाजवादी संघटना एकवटल्या असून, आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमात जॉर्ज फर्नांडिस जीवन गौरव पुरस्कार देऊन आणीबाणी काळात संघर्ष करणाऱ्या पुढाऱ्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुभाष मळगी, पद्मनाभ शेट्टी, विजय नारायण सिंह, मोतीलाल कनोजिया, देवी गुजर, शंकर साळवी, शंकर शेट्टी, फेड्रिक डिसा, संजीव पुजारी, सुरेश ठाकूर आदींना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात अनेक नामवंत कामगार नेते उपस्थित होते. त्यामध्ये विश्वास काटकर, अनिल हेगडे, अशोक जाधव, वामन काविस्कर, रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, हनुमंत ताटे, अशोक बेलसरे, नवनाथ गेंड, अभिषेक रंजन, मधू बिरमोळे, शिवाजी खांडेकर, पी. व्ही. फडतरे, प्रफुल्ल म्हात्रे, रमेश भुतेकर, राजेंद्र सिंह आदींचा समावेश होता.
छात्र भारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.
