नागरी समस्यांवर निवेदन सादर, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

वसई, ३० जुलै:
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन केले. यावेळी वसई-विरार शहरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी विविध नागरी समस्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.

  • वसई-विरारमधील शिष्टमंडळात जिल्हा मीडिया प्रमुख कमर बेग, हरीश कोटकर आणि अन्य पदाधिकारी सहभागी होते.
  • मुख्य निवेदनात आयआयटी मुंबई व नीरी यांना देण्यात आलेल्या निधीनंतरही अहवालानुसार अपूर्ण कामांचा उल्लेख करण्यात आला.
  • एसटीपी, होल्डिंग पॉन्ड्स, कल्व्हर्ट, तसेच मालमत्ता व आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप मांडण्यात आले.
  • एफओबी आणि आरओबी ही कामे गेल्या १० वर्षांपासून रखडल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
  • नवीन इमारतींसाठी सीसी परवानग्या रोखाव्यात, जोपर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
  • पाणीपुरवठा समस्या, तसेच रस्ते व गटारांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी.

या बैठकीत चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. या प्रकल्पासाठी झालेल्या पत्रव्यवहाराची माहिती देऊन नायगाव ते विरार भागात हस्ताक्षर मोहिम राबवण्याची भूमिका मांडण्यात आली.

तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध रखडलेल्या योजनांचा तपशील देत, महानगरपालिका मुख्यालयाच्या आरक्षित भूखंडावर ७ वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही काम सुरू न झाल्याचे निदर्शनास आणले गेले. या सर्व मुद्यांवर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित नेत्यांशी समन्वयाचे आश्वासन दिले.

प्रदेशाध्यक्षांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांना पक्षाचा जनाधार वाढवण्याचे आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले.

या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांचीही भेट घेऊन निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरी प्रश्नांवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसादामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *