प्रतिनिधी अनिल वाघेला :

नालासोपारा पूर्व परिसरात तुळिंज पोलिसांच्या ‘दहशतवाद विरोधी कक्षाने’ (ATC) एक मोठी कारवाई करत एका परदेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून ४ कोटी ८३ लाख १० हजार रुपये मूल्याचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला असून यामध्ये MDMA Ecstasy गोळ्या आणि कोकेनचा समावेश आहे.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई

​मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, पोलीस हवालदार दिगंबर परजणे, राहुल कदम, श्रीधर कांबळे, सचिन कांबळे, पोलीस अंमलदार रावसो राजगे, आजिनाथ गिते, प्रसाद पालवे आणि महिला पोलीस अंमलदार उगले यांचे पथक परिसरात बेकायदेशीरपणे राहणारे परदेशी नागरिक आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते.

​यादरम्यान, पोलीस हवालदार सचिन कांबळे यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, नालासोपारा (पूर्व) येथील नगीननगर, वैष्णवी अपार्टमेंट, रूम नं. १०६ येथे काही परदेशी नागरिक अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत आहेत.

घरझाडतीत ५ कोटींच्या घरात अंमली पदार्थ हस्तगत

​माहिती मिळताच पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी धाड टाकून ओमोरोग्बे मेरिट एनाघेडे (वय २६, मूळ रा. नायजेरिया) या महिलेला ताब्यात घेतले. तिच्या घराची व अंगझाडती घेतली असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

  • MDMA Ecstasy गोळ्या: गुलाबी, हिरव्या, पोपटी, जांभळ्या, निळ्या, राखाडी व पिवळ्या रंगाच्या तब्बल १,०१० ग्रॅम वजनाच्या गोळ्या (अंदाजे किंमत: ₹१,५१,५०,०००/-)
  • कोकेन (Cocaine): ६६३ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची पावडर (अंदाजे किंमत: ₹३,३१,५०,०००/-)

एकूण जप्त मुद्देमाल: ₹४,८३,१०,०००/- (चार कोटी त्र्याऐंशी लाख दहा हजार रुपये).

विविध कलमांखाली गुन्ह्याची नोंद

​सदर परदेशी महिला आरोपीविरुद्ध तुळिंज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर:

  • NDPS कायदा १९८५ चे कलम ८(क), २१(क), २२, २२(क)
  • दि इमोग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ चे कलम ३, २३, २४
  • भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३

​या कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिला भारतात बेकायदेशीरपणे राहून अमली पदार्थांचे नेटवर्क चालवत होती का, या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीस टीप / नोट: तुळिंज पोलिसांच्या ‘एटीसी’ पथकाच्या या सतर्कतेमुळे नालासोपारा परिसरातील एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलीस पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed