oplus_3145760

घनश्याम आंबोकर ​मिरा-भाईंदर :

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या कथित पेपरफुटीच्या प्रकारामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांना रविवारी मिरा-भाईंदरमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक गोल्डन नेक्स्ट नाका येथे सायंकाळी ५ वाजता या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावत शिक्षण व्यवस्थेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला.

​विरोधी पक्षनेत्या आफ्रीन हुसेन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) पाठिंबा दर्शवला असून मनसेचे संदीप राणे आपल्या समर्थकांसह या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झाले होते.

​या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी नीट परीक्षेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. देश भवितव्य घडवणाऱ्या तरुण पिढीला मानसिक तणावात ढकलणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवर आणि परीक्षा पद्धतीवर कठोर ताशेरे ओढण्यात आले.

प्रमुख मागण्या :
  • पारदर्शक परीक्षा पद्धती: शिक्षण व्यवस्थेत त्वरित पारदर्शकता आणून भविष्यात परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राखली जावी.
  • कठोर कारवाई: पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर व दोषींवर कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर कारवाई केली जावी.
  • गृहखात्याची उत्तरदायित्व: आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत या प्रकरणी देशाच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

​विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना आखाव्यात, असा सूर या वेळी उपस्थितांमधून उमटला. शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने पार पडलेल्या या कार्यक्रमाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed