विशेष वृत्त/प्रतिनिधी

भाईंदर:

​आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर शहरात भक्ती आणि संस्कृतीचा भव्य सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या संकल्पनेतून मिरा-भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या ५१ फूट उंच भगवान श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीसमोर शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

​भाईंदर (पूर्व) येथील नवघर तलाव परिसरातील स्वातंत्र्यसेनानी स्व. शामराव पाटील उद्यान (शंकर नारायण कॉलेजसमोर) येथे सायंकाळी ६:०० वाजता हा महाआरती सोहळा पार पडणार आहे. मिरा-भाईंदर परिसरातील हजारो वारकरी, भाविक आणि विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

वारकरी संप्रदायाचे सांस्कृतिक श्रद्धास्थान

​शहराच्या वैभवात भर घालणारी ५१ फूट उंच श्री विठ्ठलाची ही मूर्ती सध्या केवळ मिरा-भाईंदरमधीलच नव्हे, तर लगतच्या परिसरातील भाविकांसाठी मुख्य श्रद्धा व प्रेरणेचे केंद्र ठरली आहे. आषाढी एकादशीनिमित्त या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांना आणि वारकऱ्यांना विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी या महाआरतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माध्यम प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन

​या सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी सर्व वृत्तपत्रांचे बातमीदार, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी, तसेच छायाचित्रकार व व्हिडियोग्राफर्स यांना मंत्री महोदयांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रम संक्षिप्त विवरण:

  • कार्यक्रम: आषाढी एकादशीनिमित्त भव्य महाआरती सोहळा
  • दिनांक: शनिवार, २५ जुलै २०२६
  • वेळ: सायंकाळी ६:०० वाजता
  • स्थळ: स्वातंत्र्यसेनानी स्व. शामराव पाटील उद्यान, नवघर तलाव, शंकर नारायण कॉलेजसमोर, भाईंदर (पूर्व)
  • आयोजक: जनसंपर्क विभाग, मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक (परिवहन मंत्री, म.रा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed