

मुंबई, दि. २१ मे २०२५:
मुंबई महानगर पालिका मुख्यालयात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन (६०) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. शेरसिंग डोगरे, मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त मा. श्री. अभिजीत बांगर, उपआयुक्त श्री. किरण दिघावकर, मुख्य अभियंता श्री. प्रशांत पवार, मुख्य पर्यवेक्षक श्री. प्रवीण सांगळे तसेच मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि आश्रय योजनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकमधील मुख्य मुद्दे:
१. मोटर लोडर ML चौकीचे खासगीकरणास विरोध:
पारंपरिक स्वरूपात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या जागेवर खासगी कर्मचारी नेमण्याचा विरोध करत युनियनने ही पद्धत तत्काळ थांबविण्याची मागणी केली. गोविंदभाई परमार यांनी ही मागणी लिखित स्वरूपात सादर केली.
२. मालकी हक्क घराची मागणी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम श्राफल्य योजना अंतर्गत फक्त ५० सेवानिवृत्त सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळाली. त्यानंतर ही योजना थांबवण्यात आली. युनियनने माहुल गावात मोफत मालकी हक्क घरे देण्याची मागणी केली आहे.
३. लाड पागे समितीच्या धोरणानुसार घर देण्याची मागणी:
१९८५, ८६, ८७ च्या धोरणानुसार घर देण्याची मागणी करत मनपाच्या २४/०२/२०२३ च्या परिपत्रकावर आधारित आश्रय योजना रद्द करण्याचे युनियनचे स्पष्ट मत आहे.
गौतम नगर वसाहतीतील गंभीर परिस्थिती:
दादर येथील गौतम नगर मनपा वसाहतीतून सफाई कामगारांना घर खाली करण्यासाठी मिळालेल्या नोटिसांमुळे, अनेक कामगार कुटुंबे भीतीखाली आहेत. महिला व वयोवृद्ध कर्मचार्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. ५ मे रोजी पोलिस आणि खासगी बाऊंसरसह कर्मचारी घरे खाली करण्यास गेले होते, त्यामुळे एक ७० वर्षांची महिला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन पावली, अशी माहिती पुढे आली आहे.
मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या आश्वासनाची आठवण:
१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी वसाहतीची पाहणी करत “घर खाली करू नये” असा स्पष्ट आदेश दिला होता. त्यावेळी आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल व आमदार श्री. कालिदास कोळंबकर हे उपस्थित होते. पण आता पुन्हा नोटीस पाठवून घर खाली करण्याचा दबाव सुरु असल्याने कामगार त्रस्त आहेत.
डोगरे साहेबांची ठाम भूमिका:
सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. डोंगरे यांनी वसाहतीला भेट देऊन, मनपा आयुक्तांच्या दालनात ठामपणे मांडणी केली की, “या कर्मचाऱ्यांना तात्काळ पुनर्वसन न देता घरे खाली करणे अन्यायकारक आहे.” तसेच त्यांनी निलंबनासारखी शिक्षा देऊ नये, अशीही स्पष्ट भूमिका घेतली.
गोविंदभाई परमार यांचे आवाहन:
“कोरोनाच्या संकट काळात सफाई कामगारांनी आपले प्राण पणाला लावून काम केले, आणि आज त्यांनाच घराबाहेर काढले जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मा. श्री. एकनाथ शिंदे आणि मा. श्री. अजित दादा पवार यांना हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी कळकळीची विनंती युनियनने केली आहे.
निष्कर्ष:
या ऐतिहासिक बैठकीत मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या घरे, कामाचे खासगीकरण, पुनर्वसन आणि न्याय्य वागणूक या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा, अशी कामगार संघटनांची अपेक्षा आहे.
