सांडोर-सालोली येथील उचलेश्वर तलावातील प्रकार…
तलावाचे ओबडधोबड खोदकाम अंगलट; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
दोषी अभियंते व कंत्राटदारावर कारवाईची मागणी
बहुजन महा व्यूज अँड न्युज विशेष प्रतिनिधी | वसई
पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारणाऱ्या वसई-विरार शहर महापालिकेच्या कारभाराचा आणखी एक बेजबाबदार नमुना समोर आला आहे. सांडोर-सालोली येथील ऐतिहासिक उचलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली कंत्राटदाराने केलेल्या अयोग्य व ओबडधोबड खोदकामामुळे किनाऱ्यावर असलेली १०० वर्षांहून अधिक जुनी तीन भव्य वडाची झाडे बुधवारी सकाळी मुळासकट उपटून तलावात कोलमडली. ही झाडे लगतच्या गाववस्तीवर न पडता तलावात कोसळल्याने सुदैवाने सुमारे ४० ते ५० ग्रामस्थांचा जीव वाचला असून मोठा अनर्थ टळला आहे.उचलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. काम सुरू असताना कंत्राटदाराने तलावातील माती उकरून ती परस्पर गावाबाहेर वाहून नेली. ही माती किनाऱ्यावरील जुनाट झाडांच्या बुंध्याशी टाकून किनाऱ्याला भक्कम आधार देणे आवश्यक होते. “माती झाडांच्या कडेला टाका, अन्यथा पावसाळ्यात झाडे कोसळतील,” असा इशारा स्थानिक गावकऱ्यांनी वेळोवेळी कंत्राटदार व लोकप्रतिनिधींना दिला होता. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गावकऱ्यांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर गेल्या दोन वर्षांत सुशोभीकरण तर पूर्ण झालेच नाही, उलट झाडांची मुळे भुसभुशीत होऊन ही शतकोत्तरी वृक्षसंपदा जमीनदोस्त झाली.झाडे कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक समाजसेवक जेरी मच्याडो यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना ते म्हणाले, “प्रशासकीय अनास्थेमुळे आज वसईने आपली शतकोत्तरी वृक्षसंपदा गमावली आहे. झाडे जर तलावाऐवजी बाजूच्या घरांवर कोसळली असती, तर अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला असता. महापालिका प्रशासन आणि आमदार स्नेहा ताई यांनी तात्काळ या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी. या कामातील संबंधित कंत्राटदार, जबाबदार इंजिनीअर आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.”दरम्यान, तलावाच्या उर्वरित तीनही बाजूंना असलेली जुनी झाडे सुरक्षित राहण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचा धोका टळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ संरक्षक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी सांडोर-सालोलीतील नागरिकांमधून केली जात आहे.
