प्रतिनिधी, वसई
वसई-विरारमधील माध्यम क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी आणि सर्व पत्रकारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची पहिली ऐतिहासिक आणि लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. वसईच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व माध्यमांतील आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणून, त्यांच्या हक्क आणि कल्याणासाठी ही निवडणूक घेतली जात आहे. १५ जणांच्या सक्षम कार्यकारिणीसाठी १ जून ते ५ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
पत्रकारांमध्ये सामाजिक सलोखा आणि व्यावसायिक एकता निर्माण करण्याच्या या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. नुकतीच वसईच्या हॉटेल रिजेन्सीमध्ये या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला दैनिके, इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स, साप्ताहिके आणि डिजिटल मीडियाचे १५२ हून अधिक प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. पत्रकारितेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे आणि त्यांना समान संधी मिळावी, या उद्देशाने महिला पत्रकारांची उपस्थिती अत्यंत लक्षणीय होती. आतापर्यंत २०० हून अधिक पत्रकारांनी या चळवळीत विश्वासाने सहभाग नोंदवत सदस्यत्वाचे अर्ज दाखल केले आहेत.पत्रकारांच्या या हक्काच्या व्यासपीठावर पारदर्शकता राहावी, यासाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. मयूर परिख आणि ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काश्यप यांची ‘निवडणूक निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करत, ही प्रक्रिया अत्यंत निकोप आणि लोकशाही मार्गाने पार पडणार असल्याचे स्पष्ट केले.

  • उमेदवारी अर्ज भरणे: १ ते ५ जून
  • अर्ज माघारी घेणे: ६ जून
  • अर्जांची छाननी व अंतिम यादी: ७ जून
  • मतदान (मतपत्रिकेद्वारे): १२ जून
  • पत्रकार संघाची कार्यकारिणी ही केवळ पद नसून पत्रकारांच्या सामाजिक आणि कौटुंबिक हितासाठी काम करणारी यंत्रणा असेल. यासाठी १५ जणांची सर्वसमावेशक रचना करण्यात आली आहे:
  • अध्यक्ष: १ पद | उपाध्यक्ष: २ पदे
  • महिला कार्याध्यक्ष (विशेष राखीव पद): १ पद
  • सचिव: १ पद | सहसचिव: १ पद | खजिनदार: १ पद
  • कार्यकारिणी सदस्य: ८ पदे,या पत्रकार संघाच्या माध्यमातून वसई-विरारमधील पत्रकारांच्या आरोग्य, सुरक्षा, विमा आणि व्यावसायिक अडीअडचणी सोडवण्यासाठी एकत्रितपणे सामाजिक काम केले जाणार आहे, ज्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय दृष्टीने न पाहता, ‘पत्रकार कल्याण पर्व’ म्हणून पाहिले जात आहे.
  • कार्यक्रमाची सुरुवात करताना पत्रकार सुहास बिर्‍हाडे यांनी पत्रकार संघाची उद्दिष्टे आणि पत्रकारांच्या सामाजिक जबाबदारीची प्रस्तावना केली. पत्रकार विजय गायकवाड यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सुप्रसिद्ध सुसंवादक कुणाल रेगे यांनी आपल्या खुमासदार आणि सकारात्मक शैलीत कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव पाटोळे यांनी समन्वयक म्हणून सर्व पत्रकारांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावली. विजय देसाई व राज शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर विजय खेतले यांनी सर्वांचे आभार मानून या ऐतिहासिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *