वसई-पालघर:

पुरोगामी विचारांची मशाल हाती घेतलेल्या प्रजा सुराज्य पक्ष आणि राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेच्या वतीने जिल्ह्यात ‘शिव-भीम जन्म महोत्सव अंतर्गत सामाजिक समता अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी सम्राट अशोक जयंतीपासून या अभियानाचा शुभारंभ होणार असून, १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वसईत भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

​समतेची मोटारसायकल रॅली

​या अभियानातील मुख्य आकर्षण म्हणजे १४ एप्रिल रोजी निघणारी ‘सामाजिक समता रॅली’. वसई पश्चिम येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक, पापडी येथून सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. किमान १५० मोटारसायकल स्वरांचा सहभाग असलेल्या या रॅलीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.

रॅलीचा मार्ग:

हुतात्मा स्मारक (पापडी) – तामतलाव – एस.टी. डेपो – पारनाका – सोमवार पेठ – झेंडा बाजार – दीपमाळ – कोर्ट नाका (छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन) – सिद्धार्थ नगर.

​रॅलीचा समारोप सिद्धार्थ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व अभियानाचा आशय स्पष्ट करून करण्यात येईल.

​महिनाभर चालणार उपक्रम

​प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब तिगोते यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान आखण्यात आले आहे. अभियानाचा प्रारंभ ४ एप्रिलला होईल, तर याचा भव्य समारोप १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​”कायद्याच्या चौकटीत राहून आणि सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही ही पुरोगामी चळवळ पुढे नेत आहोत. सर्व समाजघटकांना एकत्र आणून समतेचा विचार रुजवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.”

— अण्णासाहेब तिगोटे (सचिव, प्रजा सुराज्य पक्ष)

​या अभियानात जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्ष आणि संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *