मिरां भाईंदर (घनश्याम आंबोकार) :स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गौरव गार्डन कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विजेती तरुण कराटेपटू आणि सामाजिक कार्यकर्ता अनन्या जोशी हिचा गौरव करण्यात आला. ती एक अत्यंत कर्तृत्ववान आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे, असे गौरवोद्गार कॉम्प्लेक्सचे चेअरमन घनश्याम आंबोकर यांनी काढले.एप्रिल महिन्यात हैदराबाद येथे पार पडलेल्या सर्वात मोठ्या कराटे प्रदर्शनात अनन्या जोशी हिने सहभाग घेतला होता. या प्रतिष्ठित सोहळ्यात तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीवरून कराटे खेळाप्रती असलेले तिचे समर्पण आणि उत्कृष्ट कार्य स्पष्ट होते. तिच्या या यशाची दखल घेत माजी उपराज्यपाल अरुण देव यांनीही तिच्या सामाजिक कार्याची विशेष प्रशंसा केली आहे.केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर समाजसेवेतही अनन्या अग्रेसर आहे. आपल्या लहान स्वरूपाच्या ड्रॉपशिपिंग व्यवसायामधून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही हिस्सा ती ‘कॅप फाउंडेशन’ आणि ‘स्माईल फाउंडेशन’ यांसारख्या नामांकित संस्थांना सुपूर्द करते. याद्वारे ती विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये आपले खारीचा वाटा उचलत असून, समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडत आहे.इतक्या तरुण वयात अनन्याने मिळवलेले यश हे तिच्या ‘मोठी स्वप्ने पाहा, कठोर परिश्रम करा आणि समाजाला परत द्या’ या विचारसरणीचे प्रतीक आहे. गौरव गार्डन कॉम्प्लेक्सच्या वतीने अनन्या जोशीचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी सर्व प्रवासात तिला यश लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमास सोसायटीचे सभासद, कमिटी सदस्य तसेच मुंबई गुजराती पत्रकार संघाचे खजिनदार आणि जन्मभूमी दैनिकाचे पत्रकार जितेश वोरा हे विशेष रूप से उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांच्यावतीने अनन्याला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन झाली.
