मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक आणि स्वराज्याचे पराक्रमी वीर जिवाजी महाले यांच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर येथील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली.

​प्रतापगडाच्या ऐतिहासिक युद्धात, अफझलखानाच्या भेटीदरम्यान ‘सय्यद बंडा’ने छत्रपती शिवाजी महाराजांवर प्राणांतिक हल्ला केला होता. त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता सय्यद बंडाचा खात्मा करून जिवाजी महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवले. याच शौर्यामुळे इतिहासात “होते जिवा म्हणून वाचले शिवा” ही म्हण अजरामर झाली. वीर जिवाजी महाले यांच्या या अभूतपूर्व स्वराज्यनिष्ठेची आणि पराक्रमाची दखल घेत शासनाने हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि नाभिक समाजात अत्यंत सकारात्मक स्वागत होत आहे.

​२३ वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

​वीर जिवाजी महाले यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी ‘अखिल भारतीय जिवा सेना’ गेल्या २३ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील होती. संघटनेने स्मारकासाठी आवश्यक असणारे सर्व ऐतिहासिक दाखले आणि पुरावे जमा करून शासन दरबारी सादर केले होते. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विधिमंडळातही हा प्रश्न वारंवार उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या प्रदीर्घ लढ्याला आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

“हे स्मारक केवळ एक वास्तू नसून स्वराज्यनिष्ठा, पराक्रम आणि त्यागाचे जिवंत प्रेरणास्थान ठरेल. भावी पिढीला वीर जिवाजी महाले यांच्या कार्यातून राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळेल. शासनाने स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करून ते शिवभक्तांसाठी खुले करावे हीच अपेक्षा आहे.”

अखिल भारतीय जिवा सेना

​शासनाच्या या सकारात्मक निर्णयानंतर अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र शासन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी आणि या मोहिमेला बळ देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

GR दि. 09-07-2026 प्रा.प.वि.यो. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले स्मारक उभारण्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed