वसई-विरार, प्रतिनिधी – संविधान प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील प्रेक्षणीय स्थळी संविधान प्रस्ताविकेची कोनशीला उभारण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात नवनिर्वाचित महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या भेटीदरम्यान शहरातील विविध नागरी प्रश्नांवरही चर्चा झाली. विशेषत: अण्णा पाडा व जीवदानी पाडा परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था तसेच नाल्यांच्या समस्येकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

भुईगाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य ‘संविधान पार्क’च्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल, तसेच संविधान प्रस्ताविकेची कोनशीला उभारण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन महापौर अजीव पाटील यांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात आली.

या शिष्टमंडळात एकनाथ निकम, अॅड. गिरीश दिवाणजी,महेश हाटे,नितीन उबाळे, विकास कदम, अविनाश कापसे, सुमित रुके, दीपक गमरे, यादव आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *