वसई (प्रतिनिधी) —
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित जनजागृती अभियान अंतर्गत, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी कोर्ट नाका, वसई (पश्चिम) येथे सामाजिक न्याय पुनर्स्थापनेसाठी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रजा सुराज्य पक्ष व राष्ट्रीय बहुजन विकास संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याआधी २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मोत्सवही सामाजिक समतेचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी प्रजा सुराज्य पक्षाच्या पालघर महिला जिल्हा अध्यक्षा रमा जाधव, ॲड. किरण म्हात्रे उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी पक्षाचे सहसचिव राहुल हुडानशिव होते. मार्गदर्शन करताना अण्णासाहेब तिगोटे म्हणाले, “बेकी नको, एकी हवी. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सर्व लोक, संघटना व पक्षांनी एकत्र येऊन बुरसटलेल्या विचारांना सामोरे जाणे ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये क्रिमिनल जस्टीस क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मा. चंद्रकला भोजने यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये:
विनायक खर्डे, अध्यक्ष – शंभूराजे मिशन
जितेंद्र शिरसाट, कार्याध्यक्ष – राष्ट्रीय बहुजन विकास संघटना
ॲड. आसिफ शेख, युवा अध्यक्ष
मंदा वाघ, उपाध्यक्षा
अनिल वाघेला, गुजरात संपर्क प्रमुख
सलमा सय्यद, वसई तालुका महिला उपाध्यक्षा
मीना तडवी, वसई-विरार शहर महिला सचिव
तसेच लता वाघ, अर्चना भगत, गीता पानपाटील, दीपक माने, मंगेश भगत, सुरेश ठोंबरे, सचिन गांगडे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या जनजागृती उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि माणुसकी यासारख्या संविधानिक मूल्यांची जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण करणे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार व कार्य युवकांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार करण्यात आला.
