वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलायस डीसिल्वा यांनी प्रशासना विरोधात केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे . कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली किंवा कोणत्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन न करता सर्वसामान्य जनतेच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाची वसईचे प्रांत अधिकारी शेखर घाडगे यांनी दखल घेतली असून या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वसई तालुक्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले एलायस डिसिल्वा यांनी महसूल, भूमि अभिलेख कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या गैरकारभार व भ्रष्टाचारा विरोधात एक दिवसीय आंदोलन केले होते.
वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी लागली , त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत वसईकरांच्या तक्रारींबाबत एक बैठक घेवून त्यातून तोडगा काढण्याचे आश्वासन आंदोलन करताना दिले होते त्यानुसार, 14 मे रोजी वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिकारी व तक्रारग्रस्त वसईकर यांमध्ये बैठक पार पडली.
महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी हे आपसंगत करून वसईकर जनतेचे सातबारा नोंद व फेरफार आर्थिक फायद्यासाठी रखडवून त्रास देत आहेत, हे सर्व भ्रष्ट अधिकारी तीन वर्षाहून अधिक काळ आपल्या जागेवर ठाण मांडून आहेत, त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी असे स्पष्ट मत डिसिल्वा यांनी प्रांत अधिकाऱ्यांसमोर मांडले. यावर प्रांत अधिकारी शेखर घाडगे यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषी असलेले तलाठी व मंडळाधिकारी यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
वसई तालुक्यात आरटीओ विभागाअंतर्गत येणारी वाहने व त्यांचे परवाने हे नियमबाह्य असताना रस्त्यांवरती आरटीओ चा आशीर्वादाने धावत आहेत. पाणी वाहून देणारे टँकर, मॅजिक डमडम ही वाहने नियमबाह्य असताना त्यावर कारवाई केली जात नाही, त्यामुळे पंधरवड्याने कारवाईची मोहीम सुरू करण्यात यावी अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार चव्हाट्यावर आणताना सुनील डीस्लिवा सांगतात की, भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर असून त्यांच्यामार्फत आलेल्या कामांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते.
नुकत्याच या कार्यालयात ९ वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या खाजगी कर्मचारी महिलेचा गैरप्रकार समोर आला होता. वसईकर जनतेने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर या महिलेला कामावरून कमी करण्यात आले होते..
अनेक वर्षांपासून वसई-करांची प्रकरणे प्रलंबित ठेवली आहेत, आर्थिक फायद्यासाठी हे अधिकारी जनतेला त्रास देत आहेत. वसईकरांची जमीन ही आमच्या हक्काची आहे ,यावर हुकुमशाही करणारे हे अधिकारी इथले कोण आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला यावर प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील तक्रारी संबंधितचा सर्व प्रकार एसएलआर अधिकाऱ्यांसमोर मांडणार असल्याचे सांगितले.
अर्नाळा वसई या राज्य मार्गावर पालिकेचे जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे त्यामुळे पश्चिम पट्ट्यात राहणाऱ्या अनेक नागरिकांना वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, हा मुद्दा देखील डीसीलवा यांनी यावेळी उपस्थित केला यावर उपस्थित पालिकेच्या अभियंतांनी १० टकके काम अपूर्ण असून पावसाआधीच तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले.
……
उपविभागीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर वसई तालुक्यातील संबंधित सर्व शासकीय अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.तसेच या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते एव्हरेस्ट डाबरे,नेल्सन डिसोजा,निलेश वर्तक,रॉबी डिसोजा,विल्सन आल्मेडा,उमेश आल्मेडा आदी.

