मीरा-भाईंदर घनश्याम आंबोकर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी हातात बॅनर झळकावत कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली.लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, विद्यार्थ्यांनी न्याय्य मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर झालेली पोलीस कारवाई म्हणजे थेट लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषी पोलिसांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

​”देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, हुकूमशाहीच्या जोरावर चालत नाही. या घटनेची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्र्यांनी पायउतार झाले पाहिजे.”

मीरा-भाईंदर युवक काँग्रेस

​संसदेचे अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या दुर्दैवी प्रकारावर संसदेत सविस्तर चर्चा घडवून आणत देशासमोर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी आग्रही मागणीही आंदोलकांनी केली. देशातील संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नैतिक उत्तरदायित्व स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा इशारा या वेळी देण्यात आला.या निदर्शनांमध्ये मीरा-भाईंदर युवक काँग्रेसचे दीपक बागरी, रवि खरात, कुणाल काटकर, गौरव अगरवाल, लवकुश यादव आणि सूरज सोनकर यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed