घनश्याम आंबोकार – वृत्तसेवा, मीरा-भाईंदर
मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या तब्बल १२ लाखांच्या घरात पोहोचली असतानाही, येथील शिधावाटप कार्यालयातील विस्कळीत इंटरनेट आणि टेलिफोन सुविधोमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. रेशन कार्ड, केवायसी (KYC) आणि आधार लिंकिंगसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ऑनलाईन कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची होणारी फरफट थांबवण्यासाठी अखेर ‘माणुसकी फौंडेशन’ने पुढाकार घेतला. फौंडेशनचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष राजू शेवंते यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे दोन वर्षांनंतर या कार्यालयातील वाय-फाय आणि टेलिफोन सेवा पूर्ववत सुरू झाली असून, नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
ऑनलाईन कामांसाठी नेटवर्कचा ‘वनवास’
भाईंदर पूर्व येथील ४५ फ परिमंडळ शिधावाटप कार्यालयात दररोज १०० ते २०० नागरिक विविध कामांसाठी येतात. शासनाच्या नवीन नियमांनुसार रेशनशी संबंधित बहुतांश कामे ‘मेरा रेशन’ ॲप किंवा ऑनलाईन पोर्टलवरून करणे बंधनकारक आहे. मात्र, या शिधावाटप कार्यालयाच्या इमारतीमध्ये जिओ, व्होडाफोन, एअरटेल या प्रमुख कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क अत्यंत क्षीण (कमी) मिळते. कार्यालयात सार्वजनिक वाय-फाय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामगार वर्गाला ऑनलाईन प्रक्रियेसाठी तासनतास ताटकळत राहावे लागत होते.
“आधार लिंक करताना मोबाईलवर ओटीपी (OTP) येत नाही. त्यामुळे नेटवर्क शोधण्यासाठी थेट बाहेर रस्त्यावर जावे लागायचे. तिथून काम करून पुन्हा उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागत होते. आता वाय-फाय सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.”
— नामदेव पाटील, स्थानिक नागरिक
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आश्वासन पूर्ण
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राजू शेवंते यांनी शिधावाटप अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे दाद मागितली होती. त्यावर तत्कालीन शिधावाटप अधिकारी किरपणे यांनी, “वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला असून मंजुरी मिळताच बीएसएनएल (BSNL) मार्फत वाय-फाय सुरू करू”, असे आश्वासन दिले होते. या शासकीय प्रक्रियेला आणि सुविधा पुन्हा सुरू होण्यास तब्बल २ वर्षांचा कालावधी लागला असला, तरी अखेर हे आश्वासन पूर्ण झाले आहे.
कार्यालयात टेलिफोन आणि हाय-स्पीड वाय-फाय इंटरनेट सेवा सुरू झाल्याने रेशन कार्ड धारकांची कामे आता गतीने होत आहेत. माणुसकी फौंडेशनच्या या जनहितार्थ पाठपुराव्याबद्दल मीरा-भाईंदरच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

