घनश्याम आंबोकार वृत्तसेवा, मीरा रोड:

​लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी शहरात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांच्या पुढाकारातून या पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

​मीरा रोड येथील आला हजरत मैदान परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या मोहिमेला युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​”राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ दिखाऊ कार्यक्रम न करता, समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची आमची परंपरा आहे. वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्याचा आणि शहराचे हरित कवच वाढवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”

– सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन (उपाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)

​या प्रसंगी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत जास्तीत जास्त झाडे लावण्याचे व ती जगवण्याचे आवाहन करण्यात आले. ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा – हिरवे शहर, सुंदर शहर’ अशा घोषणा देत सहभागी नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *