‘बाबासाहेबानं दिलं हे…बाबासाहेबानं!’~ ॲड. संदीप केदारे.

UGC च्या नव्या नियमांच्या विरोधात (जातीय भेदभाव कमी करण्यासाठी बनवलेल्या) एका तरुणीनं JNUमध्ये
‘ब्राह्मणवाद मनुस्मृती जिंदाबाद, “च्या घोषणा दिल्या.

महिलांना वारसाहक्क, घटस्फोटाचा अधिकार, कायदेशीर संरक्षण आणि मुळातच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला. आज जीन्स आणि शर्ट घालून, स्वतःच्या आवडीनं जगण्याचं स्वातंत्र्य उपभोगणारी एक तरुणी जेव्हा ‘मनुस्मृती’तून जन्मलेल्या ब्राह्मणवादाचं समर्थन करते, तेव्हा वाटतं की, जणू कोंबडी स्वतःहून KFC कडं चालली आहे. असो. ती तरुणी घोषणा काहीही देत असली तरीही आवडतील ते कपडे घालून गर्दीचं नेतृत्व करण्याचा आणि घोषणा देण्याचा अधिकारही तिला बाबासाहेबामुळंच मिळालेला आहे. म्हणून तीही अभिमानानं म्हणू शकते : ‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं’!

आजही महारवाड्यात राहणाऱ्या आमच्या दिव्याच्या घरी आलेल्या पाटलाला तिच्या वस्तीतल्या घरचं पाणी चालत नाही; पण तिच्या आईनं कर्ज फेडण्यासाठी घाम गाळून कमावलेल्या नोटा चालतात. तिच्या बापानं सिमेंटमध्ये घाम मिसळून बांधलेल्या भिंती चालतात. मग अशा दुटप्पी व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून दिव्यानं उच्च शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं आणि पुन्हा ठामपणे म्हणावं : ‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं’!

जेव्हा प्रेमसंबंधात असतानाही, लग्न करण्याची वेळ आल्यावर मात्र ‘तो किंवा ती दलित आहे’ म्हणून नातं नाकारलं जातं, तेव्हा ठणकावून सांगायला हवं, “अन्याय सहन करणं ही आपली परंपरा नाही; अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच आपली ओळख आहे.” आणि तेव्हा अस्पृश्यतानिर्मूलनाच्या अनुच्छेद १७ चा उल्लेख करावा आणि पुन्हा म्हणावं : ‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं’!

घरात ब्राह्मणवादी आणि जातीयवादी विचार बाळगून बाहेर मात्र संविधानवादाची आणि आंबेडकरवादाची भाषा करणाऱ्या चळवळीतल्या अशा काही भंपकांचा
आणि भुरट्या राजकारण्यांचा चेहरा वेळीच ओळखून त्यांच्या नादाला न लागता संवैधानिक/राज्यघटनात्मक मार्गानं आपण पुढं जावं आणि मग म्हणावं : ‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं’!

जेव्हा एखादी मैत्रीण लग्नानंतर ‘अपत्यांच्या नावामागं आडनाव नको’ असं म्हणते तेव्हा काहीवेळा तिच्या ह्या म्हणण्यामागं ‘जात नको’ ही भूमिका नसते, तर तिला ‘कांबळे’, ‘काविरे’, ‘डेंगळे’ ह्यांसारख्या दलित आडनावांची लाज वाटते म्हणून ती तसं म्हणत असते! तेव्हा तिला सांगावं : ‘तू ज्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करतेस ना, त्या संधीचं दारही ह्या जातीत जन्मलेल्या बाबासाहेबांनीच सर्व जाती, धर्मातल्या महिलांसाठी उघडलं आहे. त्यामुळे लाज न बाळगता उलट अभिमानानं तूही म्हण : ‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं’! ‘

आज सर्वच राजकीय पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपलं मानतात. संसदेत संविधानाची प्रत दाखवली जाते, जयंतीनिमित्त मोठे कार्यक्रम होतात, स्मारकं उभी राहतात; पण त्याच वेळी निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होतात. अभिव्यक्ती-स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. EDच्या आणि CBIच्या कारवाया राजकीय शस्त्रासारख्या वापरल्या जातात. निवडणुकांपूर्वी आरोपांच्या आधारे विरोधकांना तुरुंगात टाकलं जातं आणि निवडणुका झाल्यावर आरोप हवेत विरतात.

बाबासाहेबांनी ‘संवैधानिक नैतिकता’ ही संकल्पना मांडली होती. तिचा अर्थ केवळ कायदे पाळणं हा नव्हता, तर सत्तेवर असतानाही मर्यादा पाळणं, संस्थांचा सन्मान राखणं हा होता. आजच्या राजकीय वातावरणात आंबेडकरी विचारांची खरी कसोटी इथंच लागते.

हा समाज उभा राहावा म्हणून बाबासाहेबांनी आयुष्य झिजवलं आणि रमाईनं फाटक्या साडीनं संसार सांभाळला. आज तोच समाज इतका पुढं आला आहे की, रमाईची साडी हिऱ्यांनी मढवली जावी इतकी ताकद त्याच्यात निर्माण झाली आहे.

कोणे एके काळी गळ्यात मडकं बांधून फिरावं लागलेल्या पिढ्यांच्या पुढच्या पिढ्या आज बुद्धाचं सोन्याचं लॉकेट घालतात. कधी कमरेला झाडू बांधून चालणाऱ्या लोकांच्या पुढच्या पिढ्यांच्या पाठीवर आज शाळेची किंवा कार्यालयाची बॅग आहे.

कधी गळ्यात मडकं होतं — आज हातात स्टेथोस्कोप आहे.
कधी हातात खराटा होता — आज हातात पेन आहे.
कधी पाय अनवाणी होते — आज पायात ब्रँडेड चपला आहेत.
कधी ताट रिकामं होतं — आज तूप-साखरेचंही जेवण आहे.
कधी हॉटेलात प्रवेश नव्हता — आज पंचतारांकित हॉटेलात सर्व धर्म-जातींच्या मित्रांसोबत जेवण्याचा आत्मविश्वास आहे.

म्हणूनच एक गोष्ट विसरून चालणार नाही.
ती अधिक जबाबदारीनं लक्षात ठेवायला हवी.

ती गोष्ट म्हणजे – आंबेडकरी विचार युवकांना अन्यायाविरुद्ध लढणं शिकवतो; दिशाहीन होणं नव्हे. विवेक, अभ्यास आणि संघटित कृती हीच त्याची दिशा आहे.

स्वतःच्या जातीची लाज न बाळगता हेही लक्षात ठेवायला हवं – आंबेडकरी विचार हा केवळ इतिहास नाही; तो वर्तमानाला प्रश्न विचारणारा आरसा आहे.

म्हणून स्वाभिमानानं जगताना ह्या देशातील प्रत्येक नागरिकानं, जात-धर्म-लिंग-प्रदेश-भाषा यांच्या पलीकडं जाऊन, एकदा तरी ठामपणे म्हणावं: ‘बाबासाहेबानं दिलं हे…बाबासाहेबानं’!

आता हा लेख वाचल्यावर काही जण शिवी हासडल्यासारखं म्हणतील, ‘आली मोठी आंबेडकरवादी’!

तरी हरकत नाही.
कारण, मला खात्री आहे की, हे वास्तव वाचल्यावर नकळत त्यांच्याही ओठांवर येईल : ‘बाबासाहेबानं दिलं हे… बाबासाहेबानं’…!
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
साभार:-
~ॲड. संदीप प्र. केदारे
(बीकॉम. एलएलबी. एलएलएम. तथा नोटरी, भारत सरकार),
*रिपाई ऑफ इंडिया युवक आघाडी
उत्तर मुंबई जिल्हा(महासचिव)
राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण आंतरराष्ट्रीय संस्था
(राज्य निरीक्षक) महाराष्ट्र राज्य
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद
(महाराष्ट्र कार्याध्यक्ष)
मो. 9222020500
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed