प्रतिनिधी /मुंबई:
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, राज्यातील सामाजिक आणि घटनात्मक प्रश्नांवर ऊहापोह करण्यासाठी आज एका विशेष ऑनलाईन खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी चळवळीतील विविध संघटनांच्या वतीने आयोजित ही चर्चा आज गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता पार पडणार आहे.
महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेले ‘ABCD’ वर्गीकरण, भारतीय जनगणनेतील नोंदी आणि बदलत्या कायदेशीर चौकटी यांसारख्या गंभीर विषयांवर या चर्चेत प्रकाश टाकला जाणार आहे.
या ऑनलाईन सभेमध्ये प्रामुख्याने खालील ४ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे:
१. महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘ABCD’ वर्गीकरणाचे स्वरूप आणि त्याचे सामाजिक परिणाम.
२. आगामी भारतीय जनगणनेमध्ये बौद्ध आणि अनुसूचित जातीच्या (SC) नोंदी करण्याबाबतची वस्तुस्थिती आणि जागृती.
३. बौद्धांच्या जातीच्या दाखल्यांबाबत निर्माण झालेले तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न.
४. महाराष्ट्र सरकारच्या धर्मांतर विरोधी कायद्याबाबत घटनात्मक विश्लेषण.
या महत्त्वपूर्ण चर्चेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, AIBCEF, आरक्षण हक्क कृती समिती आणि आंबेडकर हिस्ट्री असोसिएशन या संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून ॲड. डॉ. एस. के. भंडारे, डॉ. संदेश वाघ आणि सुनील निरभवणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व एस.सी., एस.टी. व बौद्ध समाजातील जागरूक नागरिक, विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींनी या लोकशाही मार्गाने आयोजित केलेल्या खुल्या चर्चेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून आपल्या हक्कांप्रति जागरूक होण्यासाठी ही चर्चा एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
