मिरा-भाईंदर:– घनश्याम आंबोकर
मिरा-भाईंदर महापालिकेच्या कारभारावर आता ‘बाजार वसुली’वरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगल नगर येथील भाजी मार्केटमध्ये गरीब विक्रेत्यांकडून दररोज तब्बल २३० रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अधिकृत कार्यादेशानुसार ही रक्कम केवळ ११८ रुपये (१०० रुपये + १८% जीएसटी) असणे अपेक्षित असताना, उर्वरित ११२ रुपये थेट ठेकेदाराच्या घशात जात असल्याचे उघड झाले आहे. यावरून ही वसुली महापालिकेच्या हितासाठी आहे की ठेकेदाराच्या फायद्यासाठी? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
प्रशासनाचा ‘अर्थ’पूर्ण वरदहस्त?
मिरा-भाईंदर युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र खरात यांनी या वसुलीच्या विसंगतीवर बोट ठेवत प्रशासनाला धारेवर धरले आहे. खरात यांच्या दाव्यानुसार, ठेकेदाराला दिलेल्या कार्यादेशात (Work Order) स्पष्टपणे नमूद केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट वसुली केली जात आहे. दिवसभर उन्हातान्हात बसून दोन पैसे कमावणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून अशा प्रकारे जास्तीचे पैसे उकळणे हा एक प्रकारे अधिकृत लूट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कार्यादेश रद्द करण्याची मागणी
प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास हा भ्रष्टाचार अधिक फोफावण्याची भीती व्यक्त होत आहे. “गरिबांच्या घामाचा पैसा ठेकेदाराच्या तिजोरीत भरण्याचे काम प्रशासन करत आहे. हा अन्यायकारक कार्यादेश तात्काळ रद्द करावा आणि जादा वसुली थांबवावी,” अशी मागणी रवींद्र खरात यांनी केली आहे. आता पालिका आयुक्त यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


