Oplus_131072

घनश्याम आंबोकर , मिरा रोड:

​देशात आणि राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भासणारा तुटवडा आणि विस्कळीत झालेल्या वितरण व्यवस्थेच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. हे आंदोलन वंचितच्या राज्यव्यापी जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आले होते.

गॅस वितरणातील अनियमितेचा फटका

​गेल्या काही काळापासून मिरा-भाईंदर शहरासह अनेक भागांत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. वेळेवर सिलेंडर न मिळणे आणि वितरणातील पारदर्शकतेचा अभाव यामुळे गृहिणींमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच मुद्द्याला हात घालत वंचित बहुजन आघाडीने मिरा रोड येथे रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.

नेत्यांचा आक्रमक पवित्रा

​सदर आंदोलनाचे नेतृत्व मिरा-भाईंदर शहराध्यक्ष इक्बाल महाडीक आणि सचिव अनिल भगत यांनी केले. यावेळी बोलताना इक्बाल महाडीक म्हणाले की, “एकीकडे उज्ज्वला योजनेच्या जाहिराती केल्या जात आहेत, तर दुसरीकडे सामान्य माणसाला हक्काचा सिलेंडर मिळवण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे किंवा अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. सरकारने या तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”

शांततेच्या मार्गाने निदर्शने

​आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आणि शांतता राखत आपला निषेध नोंदवला. यावेळी पक्षाचे अन्य जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. ‘सिलेंडरच्या किमती आणि उपलब्धता’ या विषयावर सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचे सचिव अनिल भगत यांनी स्पष्ट केले.

​मिरा रोड परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते. आता या आंदोलनानंतर गॅस वितरण यंत्रणेत सुधारणा होणार का, याकडे मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *