आरोग्य निरीक्षकांच्या नियुक्तीत दुजाभाव; एकाच महिला अधिकाऱ्यावर मुख्यालयाची मेहेरनजर

प्रतिनिधी, वसई

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यपद्धती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आरोग्य निरीक्षकांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रीय (Field) पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला गेल्या अनेक वर्षांपासून केवळ मुख्यालयातच ‘आश्रय’ देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. इतर महिला सहकारी रणरणत्या उन्हात प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असताना, केवळ एकाच अधिकाऱ्याला झुकते माप देऊन प्रशासकीय समतेच्या तत्त्वाला हरताळ फासला जात असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागातील ‘आरोग्य निरीक्षक’ हे पद अत्यंत जबाबदारीचे आहे. शहराचा कचरा वेळेवर उचलला जातोय का, ठेकेदाराचे काम समाधानकारक आहे का, हे पाहण्यासाठी या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणे कायद्याने बंधनकारक आहे. ठेकेदारांची बिले ही या निरीक्षकांच्या अहवालावरच मंजूर होतात. मात्र, तक्रारीनुसार, पालिकेतील एकूण ४८ आरोग्य निरीक्षकांपैकी ६ महिला अधिकारी आहेत. यातील ५ महिला अधिकारी प्रभागांमध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत, तर एका महिला निरीक्षकाची नियुक्ती मात्र अनेक वर्षांपासून मुख्यालयातच करण्यात आली आहे.

एकीकडे पालिकेचे कामकाज पारदर्शक असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे या विशिष्ट नियुक्तीमुळे संशयाचे धुके गडद झाले आहे. संबंधित महिला अधिकारी क्षेत्रीय कामापासून दूर का? त्यांच्यावर ही विशेष मेहेरनजर कोणाची? आणि त्यांना मुख्यालयात नेमून नेमकी कोणती प्रशासकीय गरज भागवली जात आहे? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

क्षेत्रीय निरीक्षकाचा अहवाल हा कंत्राटदारांच्या कामाचा आरसा असतो. जर एखादा निरीक्षक प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी न जाता कार्यालयात बसून राहत असेल, तर कचरा संकलनाच्या दर्जावर आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यातूनच कंत्राटदारांचे फावते आणि देयक मंजुरी प्रक्रियेत अनियमितता होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

“प्रशासनात सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. इतर महिला अधिकारी फिल्डवर काम करू शकतात, तर एकाच व्यक्तीला सवलत का? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन सर्व आरोग्य निरीक्षकांना समान निकषांवर क्षेत्रीय जबाबदारी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.”

​आता या गंभीर आरोपांवर वसई-विरार महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांची ‘फिल्ड’वर रवानगी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *