मिरा-भाईंदरमध्ये भूमिपुत्रांच्या हकालपट्टीचा डाव; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
मीरा भाईंदर (घनश्याम आंबोकर): “मिरा-भाईंदर हे मराठी आगरी-कोळी भूमिपुत्रांनी वसवलेले शहर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी पद्धतशीरपणे इथल्या मराठी माणसाला आणि भूमिपुत्रांना शहराबाहेर काढण्याचे काम करत आहेत,” असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाईंदर पश्चिम येथील मुर्धा गावात पालिकेने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करून बुलडोझरच्या साहाय्याने भूमिपुत्राचे घर पाडल्याच्या घटनेनंतर ते बोलत होते. या मुद्द्यावरून आगामी काळात मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
मंत्र्यांनी केलेले प्रमुख आरोप
- जमिनी लाटण्याचा घाट: मूळ गावठणातील भूमिपुत्रांच्या जमिनी पद्धतशीरपणे बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत.
- स्थानिक भूमिपुत्रांना डावलणे: पालिकेतील नोकऱ्या आणि विविध ठेकेदार कामांमध्ये स्थानिकांना जाणीवपूर्वक बेदखल केले जात आहे.
- नियोजनामध्ये दुजाभाव: शहराचे विकास नियोजन स्थानिक भूमिपुत्रांच्या हिताऐवजी बाहेरच्या लोकांच्या फायद्यासाठी केले जात आहे.
स्थानिकांवर होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्तया वर उतरावे लागले तरी चालेल, मागे हटणार नाही.”
तसेच, या गंभीर प्रकरणाची दखल घेत हा मुद्दा आगामी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला जाईल आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
थोडक्यात पार्श्वभूमी: मिरा-भाईंदरच्या स्थानिक राजकारणात भूमिपुत्र विरुद्ध बाहेरील व्यक्ती हा वाद जुना असला, तरी राज्याचे परिवहन मंत्री उघडपणे भूमीपुत्रांच्या बाजूने रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेत आल्यामुळे या वादाला आता राज्यव्यापी राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे.
