प्रशासकीय काळातील कामांची थकबाकी आणि कर्जाचा डोंगर; MMRDA च्या निधीतून कामे पूर्ण करण्याची मागणी
मीरा भाईंदर (घनश्याम आंबोकार) : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांच्या बिलांची थकबाकी आणि त्यासाठी पुन्हा ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रस्तावावरून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. आधीच महापालिकेवर कर्जाचा डोंगर असताना, विकासकामांसाठी पुन्हा कर्ज काढणे अयोग्य असल्याचे सांगत, परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, कर्ज काढण्याऐवजी MMRDA च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण? मिरा-भाईंदर महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना निविदा प्रक्रिया राबवून सुमारे ५०० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. तत्कालीन सत्ताधारी पक्षाने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेण्यासाठी शासनाकडे मंजुरी मागितली होती आणि ती मिळालीही होती. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यानंतर आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या स्व:निधीतून खर्च करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, अद्यापही ठेकेदारांची बिले थकीत असल्याने काही रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत.
कर्जाचा बोजा टाळण्याचे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ज्या वेळी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, त्यावेळी बँक कर्ज मंजूर नव्हते. बँक कर्ज मंजूर नसल्यावर निविदा काढणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नव्हतेच. आता शहर आधीच कर्जाच्या खाईत असताना, नवीन कर्ज घेणे नागरिकांवर अतिरिक्त बोजा टाकणारे ठरेल.
MMRDA चा पर्याय यावर उपाय सुचवताना सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात प्रशासकीय राजवटीत MMRDA द्वारे शहरातील विकासकामांसाठी ३००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याच धर्तीवर, आताही MMRDA कडून ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे नवीन कर्ज न काढता, MMRDA च्या माध्यमातून किंवा महापालिकेच्या निधीतून ही कामे पूर्ण करावीत आणि तसे निर्देश प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे मिरा-भाईंदरच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

