बहुजन महा व्यूज अँड न्युज वृत्तसेवा, वसई:

​वसई-विरार उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक १३ मधील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत स्थानिक नगरसेविका ॲड. दीप्ती चेतन भोईर यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाचा धडाका लावला आहे. बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेन्द्रजी ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाशी समन्वय साधत प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, तुंबलेले पाणी आणि धोकादायक झाडे हटवण्याची कामे युद्धपातळीवर मार्गी लावली आहेत.

​वाहतुकीचे अडथळे दूर; धोकादायक झाडे हटवली

​प्रभागातील नानभाट-शिडी येथील मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. स्थानिक कार्यकर्ते कपिल निजाई यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, नगरसेविका ॲड. दीप्ती भोईर यांनी तातडीने मनपाच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. त्यांच्या उपस्थितीत हे झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. तसेच नाळा येथील देवीची वाडी परिसरात एका मुख्य रस्त्यालगत धोकादायक बनलेले झाड कोसळण्याची भीती कार्यकर्ते सौरभ चौधरी यांनी व्यक्त केली होती. यावर तात्काळ पाऊल उचलत मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सदर झाड हटवून संभाव्य अपघात टळला.

​पाण्याचा निचरा आणि गटारांची स्वच्छता

​मुसळधार पावसामुळे मांगेला आळी आणि नाळा येथील साईबाबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नगरसेविकांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ मार्ग मोकळा करून दिला. दुसरीकडे, बोलिंज येथील बंदरपाडा कब्रस्थानसमोरील बंद पडलेल्या गटाराची समस्या माजी सरपंच मन्सूर शेख व फरजाना शेख यांनी मांडली. यावर नगरसेविकांनी मनपाच्या संबंधित अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून सदर गटाराची संपूर्ण स्वच्छता करून घेतली.

​खचलेला रस्ता आणि तुटलेले स्लॅब दुरुस्त

​निर्मळ-नवाळे येथील तलावाजवळील मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे खचला होता. हा मार्ग वर्दळीचा असल्याने तिथे मोठा अपघात घडण्याची शक्यता कार्यकर्ते निखिल वर्तक व प्रसाद वर्तक यांनी वर्तवली होती. नगरसेविकांनी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून या खचलेल्या रस्त्याची तात्काळ डागडुजी करून घेतली. तसेच, नाळा जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील स्मशान रोडवरील गटाराचा स्लॅब तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. कार्यकर्ते नितेश चौधरी यांच्या सूचनेनंतर मनपा प्रशासनाने या ठिकाणी नवीन स्लॅब बसवून दिला आहे.

वस्तुस्थिती आणि तत्परता

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांकडे केवळ तक्रारी म्हणून न पाहता, प्रशासकीय अधिकारांचा योग्य वापर करून आणि नियमांच्या चौकटीत राहून काम केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो, हे या कार्यवाहीतून दिसून आले. सलग पडणाऱ्या पावसातही प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून काम करून घेण्याच्या लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेचे स्थानिक नागरिकांमधून स्वागत होत आहे.

​या सर्व कामांच्या पाहणी व अंमलबजावणी दरम्यान नितेश चौधरी, जयेश चौधरी, समीर चौधरी, रितेश राऊत, हृषीकेश चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रेय चौधरी, भालचंद्र चौधरी आणि ॲड. चेतन भोईर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *