प्रतिनिधी, चंद्रपूर:

​तरुणांच्या हाताला काम आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित ‘उद्योजक व रोजगार मेळावा’ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या, तर तज्ज्ञांनी बदलत्या काळातील उद्योजकता आणि कौशल्यांचे महत्त्व विषद केले.

​राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास केंद्र, ‘देआसरा’ (deAsra) फाउंडेशन, पुणे आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशासकीय पाठबळ आणि मार्गदर्शन

​कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता ‘नोकरी देणारे’ (उद्योजक) बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे, ‘देआसरा’ फाउंडेशनच्या डॉ. योगिता कस्तुरे, कौशल्य विकास अधिकारी रोशन गभाले आणि महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

कॉर्पोरेट विश्वाची हजेरी

​या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे नामांकित कंपन्यांकडून झालेली थेट भरती प्रक्रिया. Hyundai, Vaibhav Enterprises, Ask First Services आणि Vidarbha Click Solutions यांसारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. स्थानिक स्तरावर रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

तज्ज्ञांचा कानमंत्र

​बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट डॉ. रविंद्र अहेरे आणि ब्रेन ऑप्टिमायझेशन कोच अमर नायसे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. व्यवसायातील संधी शोधणे, नेतृत्व गुण विकसित करणे आणि स्पर्धात्मक युगात मानसिकरीत्या सक्षम कसे राहावे, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.

​”विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी अशा व्यासपीठांची गरज आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांच्या करिअरला नवी दिशा मिळेल.”

डॉ. किशोर महाजन (समन्वयक, एम्प्लॉयमेंट सेल)

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृदुला रायपुरे यांनी केले, तर डॉ. किशोर महाजन यांनी आभार मानले. या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मनोज सोनटक्के यांच्यासह महाविद्यालयीन चमूने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *