महापौर अजीव पाटील यांचे सकारात्मक आश्वासन; ५ टक्के दिव्यांग निधी पारदर्शकपणे वापरण्याची मागणी
वसई : प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते देविदास जयवंत केंगार यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात महापालिकेच्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीचा योग्य व पारदर्शक वापर करावा, दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ करावी, तसेच दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी रोजगारासाठी स्टॉल व त्यांचे परवाने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिक इमारतींमध्ये लिफ्ट व रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच दिव्यांगांसाठी विशेष रोजगार मेळावे व कौशल्य प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली.
या मागण्यांवर महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांकडून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या असून महानगरपालिकेने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते देविदास केंगार यांनी व्यक्त केली.
