
वसई : मनवेल पाडा तलावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देऊनही पुतळ्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या विलंबामुळे आता विविध पक्ष आणि संघटनांतील कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.वसई-विरारशहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा, अशी भावना आंबेडकरी समाजाची होती. विरार पूर्वेला असलेल्या मनवेलपाडा तलावात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी २०१८ पासून पालिकेकडे होत होती. वसई-विरार महापालिकेने पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न करता केवळ तलावाचेसुभोभीकरण केले. यामुळे जुलै महिन्यात विविध पक्ष आणि संघटनांतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तलावासमोरील चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारला. तलावात पुतळा उभारला जात नाही तोपर्यंत नाक्यावरील अर्धाकृती पुतळा हटवला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जुलै २०२४ मध्ये पालघर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले होते. मात्र अद्याप हा पुतळा उभारण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. यामुळे आंबेडकरी समाज संतप्त झाला आहे.
आमदार राजन नाईक यांचे आश्वासन
पुतळा उभारण्यास चालढकल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी संविधान कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार राजन नाईक यांची भेट घेतली. यावेळी संविधान कृती समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मनवेलपाडा तलावात उभारण्याच्या मागणीबाबत महानगरपालिका आयुक्तांबरोबर समितीची विशेष बैठक या आठवड्यात आयोजित करून पुतळा उभारला जाईल, असे आश्वसन दिले. यावेळी संविधान कृती समितीतर्फे डॉ. दिनेश कांबळे, अॅड. कीर्तीराज लोखंडे, अॅड. गिरीश दिवाणजी, नितीन उबाळे, विशाल खैरे, एकनाथ निकम, मंगेश वाघमारे, प्रा.डी. एन. खरे, महेश हाटे, अविनाश कापसे, मनोज जाधव, विकास कदम, दीपेश येलवे, नईम ईदरसी, वैभव तायडे आदी उपस्थित होते.
