विद्यार्थ्यांचे भविष्य आणि लोकशाही हक्कांसाठी एकत्र येण्याचे सुजाण नागरिकांचे आवाहन
विरार (प्रतिनिधी):
देशातील शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्यांच्या समर्थनार्थ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शहरात शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने ‘लक्षवेधी धरणे आंदोलन’ आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज, रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता विरार येथे एका महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.हे बैठक विरार (पूर्व) येथील चंदनसार, कातकरीपाडा भागातील प्रा. डी. एन. खरे यांच्या कार्यालयात पार पडणार आहे.हा विषय कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसून, थेट देशाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था आणि नागरिकांच्या लोकशाही हक्कांशी निगडित आहे. त्यामुळे सर्व घटकांनी राजकीय मतभेद, जात, धर्म आणि विचारधारा बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन वसई-विरारमधील सुजाण व जागरूक नागरिक आणि विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आले आहे.आज सायंकाळी होणाऱ्या या बैठकीमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘लक्षवेधी धरणे आंदोलनाची’ निश्चित तारीख, ठिकाण, आंदोलनाचे स्वरूप आणि पुढील कायदेशीर कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे.या बैठकीला वसई-विरारमधील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, सामाजिक संस्था, महिला संघटना, युवा मंडळे, कामगार संघटना आणि जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या लढ्याला बळ द्यावे, असे नम्र आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२३०२३९७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
