घनश्याम आंबोकर प्रतिनिधी, मीरा भाईंदर :
देशातील लोकशाही संस्था, संविधानिक मूल्ये आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर होत असलेल्या आघातांच्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी (२ जुलै) मुंबईत ‘लोकशाही वाचवा निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अखिल भारतीय कमिटीच्या तेलंगाणा प्रभारी मीनाक्षी नटराजन यांच्या राज्यसभा उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या मुद्द्यावरून हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ही सभा होत असून, या सभेला नटराजन स्वतः उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, भारत जोडो अभियान, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी, मूलभूत अधिकार संघर्ष समिती आणि लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दादर (पश्चिम) येथील टिळक भवन येथे दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत ही सभा पार पडेल. या सभेचे अध्यक्षपद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ भूषवणार आहेत. निवडणूक आयोगासह विविध घटनात्मक संस्थांचा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली गैरवापर होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज ज्या पद्धतीने बाद करण्यात आला, ती प्रवृत्ती लोकशाहीसाठी चिंताजनक आणि अन्यायकारक आहे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे. या अन्यायाविरोधात आणि संविधानाच्या रक्षणासाठी नटराजन यांनी संघर्षाची वाट निवडली असून, हा लढा केवळ एका पक्षाचा नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा वाचवण्यासाठी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
या संघर्ष सभेच्या माध्यमातून मीनाक्षी नटराजन या उमेदवारी अर्ज बाद करण्यामागील सत्य, त्यांची पुढील राजकीय भूमिका, अनुभव आणि लोकशाहीबाबतची त्यांची दृष्टी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. या सभेला नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • दिनांक : गुरुवार, २ जुलै २०२६
  • वेळ : दुपारी १.३० ते ३.००
  • स्थळ : टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *