वसई: “भविष्यात कामगार वर्गासमोर उभी ठाकणारी आव्हाने आणि प्रशासकीय अनास्थेमुळे भरडला जाणारा सामान्य नागरिक, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विखुरलेले संघटन एकवटणे काळाची गरज आहे. सरकारने कामगार धोरणांबाबत घेतलेले निर्णय जर कामगारांच्या हिताचे नसतील, तर त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी आपल्याला संघटन अधिक मजबूत करावे लागेल,” असे परखड मत युवाशक्ती कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला यांनी व्यक्त केले.
वसई तालुका कार्यकारणीच्या घोषणा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून आगामी संघर्षाची दिशा स्पष्ट करण्यात आली.
पत्रकारांच्या अस्तित्वाचा लढा
यावेळी ‘युवाशक्ती मीडिया प्रेस अँड वर्कर्स युनियन’च्या तालुका अध्यक्षपदी कमर बेग यांची निवड करण्यात आली. बेग यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या ‘दिशा आणि दशे’वर ओढलेले ताशेरे उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. “लोकशाहीचा चौथा स्तंभ आज उपेक्षेच्या गर्तेत आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची केवळ कागदावरची अंमलबजावणी नको, तर प्रत्यक्षात संरक्षण हवे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. पत्रकारांना आधुनिक पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
प्रशासकीय ‘ढिम्म’ कारभारावर प्रहार
नवनियुक्त वसई तालुका अध्यक्ष हरेश रमेश कोटकर यांनी पदभार स्वीकारताच स्थानिक प्रशासनाला इशारा दिला. नागरी समस्यांकडे पाठ फिरवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध संघटना आता आक्रमक पवित्रा घेणार असून, लवकरच जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष रुपेश रमेश मोहिते यांनी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न लावून धरत सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सोडला.
महिला आणि श्रमिकांचा आवाज होणार बुलंद
तालुका सरचिटणीस किशोर जनार्दन मोहिते यांनी संघटनेची बांधणी तळागाळापर्यंत नेण्याची ग्वाही दिली. विशेषतः कामगार क्षेत्रातील महिलांमध्ये असलेला असंतोष आणि त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कायदेविषयक व वैद्यकीय शिबिरे राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कामगार नेता’च्या माध्यमातून लोकशाहीचा जागर
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात, संस्थापक अध्यक्ष रुबीना मुल्ला यांच्या हस्ते जावेद नासिर खान यांची ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. कायद्याच्या चौकटीत राहून, निर्भीड आणि सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून कामगारांचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी खान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, खान यांच्या आगामी वाटचालीस संघटनेच्या सर्व सभासदांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
“सरकारचे कामगार धोरण आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे श्रमिक वर्ग पिचला जात आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे हाच एकमेव पर्याय आहे.”
— रुबीना मुल्ला (संस्थापक अध्यक्ष, युवाशक्ती कामगार संघटना)





