प्रतिनिधी, वसई-विरार
आयुष्याच्या वाटेवर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, केवळ स्वत:चेच नव्हे तर समाजाचेही अस्तित्व सिद्ध करणाऱ्या महिलांच्या जिद्दीला आता हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘माणूसकी फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, येत्या रविवारी विरारमध्ये कर्तृत्ववान रणरागिणींचा गौरव होणार आहे.
’एक हात ममतेचा, एक हात समतेचा’ हे ब्रीदवाक्य प्रमाण मानून वाटचाल करणाऱ्या माणूसकी फाउंडेशनने यंदा पुरस्कारांसाठी अशा महिलांची निवड केली आहे, ज्यांनी सामाजिक, विधी, साहित्य आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारल्या गेलेल्या किंवा संकटांचा सामना करणाऱ्या महिलांसाठी हा सोहळा एक मोठी प्रेरणा ठरणार आहे.
हा सोहळा रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता विरार (पूर्व) येथील सार्वजनिक वाचनालय, वसई विरार शहर महानगरपालिका (तोटाळे तलाव शेजारी) येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडणार आहे.
संस्थेच्या महिला अध्यक्षा रजनीताई गडा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अमृता सावंत, साहित्यिक आणि पत्रकार रिया पवार, रनेश्वरी शिंदे, मनिषा खिल्लारे, सुषमा अहिरे आणि उच्च न्यायालयाच्या वकील ॲड. निलम आंबोकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सहसचिव तहसीन चिंचोलकर मांडणार असून, सूत्रसंचालनाची धुरा महिला सचिव ज्योती ताई तांबे सांभाळतील. फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर, सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष विजय काकडे यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांनी या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी केली आहे.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या संघर्षाची गाथा जाणून घेण्यासाठी विरारमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या उपक्रमाचे ‘युवाशक्ति एक्सप्रेस’, ‘आपका शहर न्यूज’ आणि ‘स्त्री दर्पण’ हे मिडिया पार्टनर आहेत.
