वसई, दि. २८ ऑक्टोबर :
भारतीय राज्यघटना स्वीकारून तिला अंमलात आणण्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर संविधान जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संविधान प्रतिष्ठान, वसई यांच्या वतीने तहसील कार्यालय प्रांगणात “संविधान उद्देशिका स्तंभ” उभारून त्याभोवतीचे सुशोभिकरण शासकीय निधीतून करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. एकनाथ निकम, सचिव ऍड. गिरीश दिवाणजी, तसेच कार्यकारिणी सदस्य दीपेश येलवे, मंगेश वाघमारे, आणि ऍड. दिपीका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तहसील कार्यालय हे तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या परिसरात संविधान उद्देशिका स्तंभ उभारल्यास नागरिकांना भारतीय संविधानाचे महत्त्व, मूल्य आणि त्यातील समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वांची जाणीव होईल.
तसेच, संविधान स्तंभामुळे येथील नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संविधानाबद्दल आदरभाव, जागरूकता आणि प्रेरणा निर्माण होईल. या हेतूनेच प्रतिष्ठानने शासकीय निधीमधून तातडीने प्रस्ताव सादर करून कामाला गती देण्याची मागणी केली आहे.
संविधान प्रतिष्ठानचा हा उपक्रम हा संविधान रक्षक आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या भावनेला साजेसा असून, समाजात लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम मानला जात आहे.

