वसई-विरार (दि. २६ ऑगस्ट) –
वसई-विरार शहर महानगरपालिकेने २५ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आयुक्त, अधिकारी, महावितरण, पोलीस, अग्निशमन विभाग यांच्यासह विविध संस्था व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्दिष्ट नागरिकांना मार्गदर्शन करणे हे असले तरी, या बैठकीत एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

बैठकीच्या व्यासपीठावर विशिष्ट राजकीय पक्षाचे माजी आमदार व माजी महापौरांना प्रमुख स्थान देण्यात आले, तर वसई तालुक्याचे प्रथम नागरिक तहसीलदार श्री. अविनाश कोष्टी यांना व्यासपीठावर न बसवता खाली बाजूला बसविण्यात आले. या प्रकारामुळे तालुक्याचे अधिकृत प्रतिनिधी असलेल्या तहसीलदारांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत असून नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

समाजवादी पार्टीचे जिल्हा सचिव कुमार राऊत यांनी आरोप केला की, “महानगरपालिकेने प्रशासनाऐवजी राजकीय पदाधिकाऱ्यांना विशेष मान दिला. तहसीलदारांचा अपमान हा वसई तालुक्याच्या जनतेचा अपमान आहे. यापुढे सर्व पक्षीय प्रतिनिधींना समान वागणूक न दिल्यास आम्हाला निषेध करावा लागेल.”

हा प्रकार प्रशासकीय प्रोटोकॉलचा भंग असल्याचे कायद्याचे जाणकार सांगत असून, न्यायालयीन कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *