वसई (प्रतिनिधी): वसईतील सागर शेत पेट्रोल पंपावर इंधनामध्ये पाणी आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी तहसील पुरवठा अधिकारी श्री. सोनार यांनी तातडीने छापा टाकून कारवाई केली आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन, पुरावे संकलित करून वसई तहसील प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहाराद्वारे मांडली होती. मुल्ला यांनी या प्रकरणात स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया व पीडित वाहनचालकांचे निवेदनही प्रशासनासमोर सादर केले.

ग्राहकांच्या मते, दूषित पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे इंजिन बंद पडून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ आणि आवश्यक वस्तू कायदा, १९५५ याअंतर्गत पंपाविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तहसील प्रशासनाने याप्रकरणी तातडीने साठ्याची तपासणी केली असून, दोषी आढळल्यास संबंधित पंपावर दंडात्मक कारवाईसोबतच भविष्यात परवाना रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते.

याशिवाय, ज्यांच्या वाहनांमध्ये पाण्यामुळे हानी झाली आहे, त्यांच्या इंजिन दुरुस्तीचा खर्च व नुकसानभरपाईची जबाबदारी पंप मालकाने उचलावी, असा ठोस आग्रह नागरिक आणि पत्रकारितेमार्फत करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये थोडीशी समाधानाची भावना निर्माण झाली असली तरी, या घटनेमुळे इंधन पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकता, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रशासनाची देखरेख यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *