वसई-विरार काँग्रेससाठी नवी संधी, आंबेडकरी समाजातील नेतृत्व पुढे!
वसई, दि. ३१ (प्रतिनिधी) — मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव आणि आंबेडकरी समाजाचे अभ्यासक डॉ. दिनेश कांबळे (विरार) व काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते डॉमिनिक डिमेलो (वसई-माणिकपूर) यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे वसई-विरारच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा काँग्रेसला बळकटी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे डॉ. दिनेश कांबळे हे आंबेडकरी समाजाचे प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व मानले जाते. त्यांनी शिक्षण, सामाजिक समता, आर्थिक न्याय आणि राज्यघटना यावर मोठे काम केले असून त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला मोठा फायदा होईल, असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्यक्त करत आहेत. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसला वसई-विरार आणि पालघर परिसरात आंबेडकरी समाजाच्या पाठबळाचा राजकीय लाभ मिळू शकतो.
तर दुसरे सरचिटणीस डॉमिनिक डिमेलो हे ख्रिश्चन समाजातील लोकप्रिय नेतृत्व मानले जाते. त्यांची सामाजिक व संघटन क्षमता, स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि सतत मैदानात राहून कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असल्यामुळे तारापूर ते भायंदर या पट्ट्यात काँग्रेसचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
या दोन्ही नियुक्त्या म्हणजे काँग्रेसने वसई-विरारच्या सामाजिक विविधतेचा योग्य अभ्यास करून प्रभावी नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. स्थानिक राजकारणात गेल्या काही काळात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांचे वर्चस्व वाढले असले, तरी काँग्रेसने या नियुक्त्यांद्वारे पुन्हा एकदा मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या नियुक्त्यांमुळे पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, असे मत युवक नेते व काँग्रेसचे विभागीय प्रवक्ते यांनी व्यक्त केले. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते राम पाटील यांनी या दोघांचे अभिनंदन करत, “डॉ. कांबळे व डॉमिनिक डिमेलो यांचे नेतृत्व काँग्रेसला वसई-विरारमध्ये पुन्हा बळकट करेल,” असे वक्तव्य केले.
