मिरा-भाईंदर (उपसंपादक घनश्याम आंबोकर): मराठी नाटक आणि सांस्कृतिक कलाकृतींच्या संवर्धनासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये मिळणारी विशेष सवलत कायम ठेवावी, अशी ठाम मागणी ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महापालिका प्रशासनाची भेट घेऊन एक विस्तृत निवेदन सादर केले.
सध्याच्या नियमांनुसार, तीन तासांच्या नाट्य प्रयोगासाठी तब्बल सहा तासांचे भाडे आकारले जाते. ही पद्धत अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मराठी रंगकर्मींच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. त्यामुळे ही जाचक पद्धत तातडीने बंद करावी आणि मराठी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ व आर्थिक दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
मराठी भाषेचा प्रसार आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने कायदेशीर चौकटीत राहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या शिष्टमंडळात मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप राणे, काँग्रेस युवा नेते सिद्धेश राणे आणि त्यांचे अन्य सहकाऱ्यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
