घनश्याम आंबोकर | मिरा-भाईंदर
भाईंदर पूर्व येथील ‘देवकी अपार्टमेंट’ या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
घटनेनंतर सरनाईक यांनी तेथील बाधित नागरिकांशी व स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवावे, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रभावित कुटुंबांच्या तात्पुरत्या निवार्याबाबत आणि पुनर्वसनाबाबत प्रशासकीय पातळीवर योग्य ते निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच बाधित कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने एक महिन्याचा शिधा (धान्य) पुरवला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या प्रसंगी बोलताना सरनाईक म्हणाले की, “क्लस्टर विकास योजनेच्या माध्यमातून परिसरातील अशा जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य आहे. यासाठी महाराष्ट्र शासन आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर तरतुदी व आवश्यक ती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.”
दरम्यान, पाहणी प्रसंगी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस व पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे आणि ढिगारा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
