​महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया; काँग्रेस प्रवक्त्यांचा प्रशासनावर निशाणा

​

​मीरा रोड, (घनश्याम आंबोकर):

शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि प्रवासी सुविधांची अवस्था किती दयनीय झाली आहे, याचे जिवंत उदाहरण मीरा रोडमधील पुनम गार्डन परिसरात पाहायला मिळत आहे. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना हक्काची सावली आणि योग्य माहिती देणारा बसथांब्याचा अधिकृत फलक चक्क जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आणि एका झाडाच्या पायथ्याशी ‘आराम’ करताना आढळल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​शहरातील नागरिकांना सुरळीत, व्यवस्थित आणि दर्जेदार सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे बसथांबे केवळ नावापुरतेच उरल्याचे दिसते. पुनम गार्डन परिसरातील या फलकाची झालेली दुर्दशा पाहता, “प्रशासनाचा वचक संपल्यामुळे परिवहन व्यवस्थेसह आता बसथांब्याचे फलकही थकून विश्रांती घेत आहेत का?” असा उपरोधिक सवाल संतप्त प्रवासी उपस्थित करत आहेत.

​सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

तुटलेले किंवा पडलेले फलक, उघड्यावर पडलेले स्टँड आणि देखभालीचा अभाव यामुळे बस कोणती आणि कुठे थांबणार, याबाबत प्रवाशांमध्ये नेहमीच संभ्रम निर्माण होतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, सार्वजनिक मालमत्तेच्या या पडझडीमुळे सुरक्षिततेचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.

​प्रशासनाला घरचा आहेर

या संपूर्ण प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र खरात यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. “नागरिकांच्या करातून चालणाऱ्या प्रशासनाला मूलभूत सुविधांची चाड उरलेली नाही. बसथांब्यासारखी साधी सुविधाही नीट राखता येत नसेल, तर परिवहन व्यवस्था सुधारण्याचे दावे पोकळ ठरतात,” असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत.

​दरम्यान, केवळ कागदी घोडे न नाचवता प्रशासनाने ताраतीतपणे या कोसळलेल्या फलकाची दुरुस्ती करून तो पुन्हा सन्मानाने उभा करावा आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता राखावी, अशी आक्रमक मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *